ठाण्यात नवमतदार सव्वादोन लाखांवर
By Admin | Updated: January 26, 2017 02:58 IST2017-01-26T02:58:45+5:302017-01-26T02:58:45+5:30
मतदारनोंदणीमध्ये ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून परिणामस्वरूप जिल्ह्यात २.२५ लाख नवमतदारांची नोंदणी झाल्याची

ठाण्यात नवमतदार सव्वादोन लाखांवर
ठाणे : मतदारनोंदणीमध्ये ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून परिणामस्वरूप जिल्ह्यात २.२५ लाख नवमतदारांची नोंदणी झाल्याची माहिती बुधवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गडकरी रंगायतनमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात देण्यात आली. ठाण्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यासह संपदा जोगळेकर आणि उदय सबनीस आदी कलाकारांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ४ टक्के नवमतदार वाढल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी प्रास्ताविकात दिली. भिवंडी, कल्याण, मुंब्रा, भार्इंदर इत्यादी मतदारसंघांमध्ये नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये तसेच क्रीडा शिबिरांमध्ये मतदानाबाबत जागृती केली. परिवहन कार्यालयात शिकाऊ परवान्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकरिता विशेष कक्ष सुरू करून तिथेही मतदारांची नोंदणी करण्यात आली. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तरच राष्ट्रीय मतदार दिनाचा उद्देश सफल होईल, असे कल्याणकर यावेळी म्हणाले.
अभिनेत्री अमिषा पटेल यांनी त्यांच्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. मतदान हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने मतदानानंतर ‘सेल्फी’ घेऊन त्याचा प्रसार करावा. मतदानातूनच देश बदलण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या. देशाला फुलाप्रमाणे घडवायचे असेल, तर देशरूपी झाडाला मतदानाच्या स्वरूपात खतपाणी घालणे आपले कर्तव्य असल्याचे अभिनेत्री संपदा जोगळेकर म्हणाल्या. आयुष्यात मोठा अधिकारी बनायचे असेल, तर अनेक परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. लोकप्रतिनिधी बनण्यासाठी एकच परीक्षा असते. ती मतदारांनी घ्यायची असते. त्यामुळे योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन अभिनेते उदय सबनीस यांनी केले.
कार्यक्रमास पोलीस आयुक्त परमबीर सिंग, आयुक्त संजीव जयस्वाल हेदेखील उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यातील विजेत्यांना देखील गौरवण्यात आले. (प्रतिनिधी)