ठाण्याचा दुचाकी चोरटा जेरबंद
By Admin | Updated: December 14, 2014 23:47 IST2014-12-14T22:22:47+5:302014-12-14T23:47:17+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दुचाकी विक्रीसाठी आला होता साताऱ्यात

ठाण्याचा दुचाकी चोरटा जेरबंद
सातारा : ठाणे येथील वर्तकनगर येथून चोरी झालेली दुचाकी शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने सातारा येथे हस्तगत केली. दुचाकी चोरटा आदित्य हणमंत सावंत यासही अटक केली असून, दुचाकी आणि त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबतची स्थानिक गुन्हे शाखेतून मिळालेली अधिक माहिती अशी की, आदित्य हणमंत सावंत हा गोलमारुती मंदिरानजीक असणाऱ्या सागर जाधव यांच्या मोटार गॅरेजमध्ये चोरीची बजाज प्लसर मोटारसायकल विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सापळा रचला.
थोड्याच वेळात सागर जाधव यांच्या गॅरेजजवळ एक युवक नंबर प्लेट नसलेल्या निळ्या रंगाची दुचाकीवर बसलेला दिसला. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे त्याला नाव, गाव आणि वाहन चालविण्याचा परवाना याची माहिती विचारली. त्यांनी आपले नव आदित्य हणमंत सावंत (वय १९, व्यवसाय - नोकरी, रा. लक्ष्मी चिरागनगर, जे. के. ग्राम केमिकलच्या मागे, पोखरड रोड नंबर १, ठाणे) असे सांगितले.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनंत चिंचकर, शामराव मदने, पृथ्वीराज घोरपडे, आवारे, संजय पवार, विजय कांबळे, शरद बेबले, मुबीन मुलाणी, नितीन शेळके, प्रवीण शिंदे, कांतिलाल नवघणे, नितीन भोसले, महेश शिंदे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
दोन महिन्यांपूर्वी केली होती चोरी
गाडीची कागदपत्रे कुठे आहेत, अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि दुचाकी वर्तकनगर, ठाणे येथून आणली असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यातून अधिक माहिती घेतली असता ही मोटारसायकल ७0 हजार रुपये किमतीची असून, तिचा क्रमांक एमएच 0४ जीके २६४१ असा आहे. ती दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेली असल्याचा गुन्हा नोंद झाला असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आदित्य सावंत आणि दुचाकी वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.