खाजगी रुग्णालयात बेड मिळविताना होतेय ठाणेकर रुग्णांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:57+5:302021-04-04T04:41:57+5:30
स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून, ठाण्यात रुग्णसंख्याही वाढते आहे. सरकारी रुग्णालयात योग्य ...

खाजगी रुग्णालयात बेड मिळविताना होतेय ठाणेकर रुग्णांची दमछाक
स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून, ठाण्यात रुग्णसंख्याही वाढते आहे. सरकारी रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे आणि पैशापेक्षा जीव महत्त्वाचा असल्याने बहुतांश रुग्ण खाजगी रुग्णालयात बेड शोधण्यासाठी धडपड करीत आहेत. या खाजगी रुग्णालयातही बेड उपलब्ध असल्याचे जरी महापालिका सांगत असली तरी तिथे तो मिळविताना सामान्य रुग्णांची दमछाक होत असल्याचे काही जाणकार ठाणेकरांनी सांगितले.
गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ पाहायला मिळते आहे. ही वाढीची संख्या भीतीदायक आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी एकीकडे महापालिका विविध यंत्रणा कार्यान्वित करीत आहे. स्वत: महापौर परिस्थितीचा आढावा घेत आहेत. परंतु, रुग्णांचा कल हा ठरावीक खाजगी रुग्णालयांत दाखल होण्याकडे अधिक दिसतो. मात्र, त्या नामांकित खाजगी रुग्णालयात कोविडचे बेड या रुग्णांना सहजरीत्या उपलब्ध होत नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
------------
ठाण्यात कोरोनारुग्णांना खाजगी रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी धडपड करावी लागते, हे खरे आहे. खाजगी रुग्णालयातील दर परवडत नसल्याने बहुतांश लोक महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होतात, तिथे त्यांना बेड मिळताहेत. मात्र, महापालिकेने कोरोनाग्रस्तांसाठी जी हेल्पलाइन सुरू केली आहे, त्या क्रमांकावर अपेक्षित तितका लवकर प्रतिसाद रुग्णांना मिळत नाही, त्या सेवेत सुधारणा करावी.
- संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, मनविसे, ठाणे
---------------
खाजगी रुग्णालयात बेड मिळत नाही ही परिस्थिती असली तरी, वाढती रुग्णसंख्या हे याचे कारण आहे. मात्र, ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये बेडही उपलब्ध असून रुग्णाची परिस्थिती लक्षात घेऊन तिथे योग्य उपचारही होतात, हे फार महत्त्वाचे आहे.
- किरण नाकती, समाजसेवक
---------
कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती महापालिकेच्या वतीने रोज अपडेट करतो; पण त्यादरम्यानच्या वेळेतही रुग्णालयात नवे रुग्ण दाखल होतात. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढतेय हेदेखील याचे एक कारण आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका.