ठाणेकरांना नको पुन्हा लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:56 IST2021-02-26T04:56:17+5:302021-02-26T04:56:17+5:30
ठाणे : लॉकडाऊन नको रे बाबा! त्याचे नाव ऐकले तरी अंगावर काटा येतो, अशा प्रतिक्रिया ठाणेकरांनी व्यक्त केल्या आहेत. ...

ठाणेकरांना नको पुन्हा लॉकडाऊन
ठाणे : लॉकडाऊन नको रे बाबा! त्याचे नाव ऐकले तरी अंगावर काटा येतो, अशा प्रतिक्रिया ठाणेकरांनी व्यक्त केल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्यासाठी अनेक उपाययोजना सरकारला करता येऊ शकतात. लॉकडाऊन आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही, अशी नाना तऱ्हेची मते ठाणेकरांकडून व्यक्त होत आहेत.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी नियमांचे पालन केले नाही, तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिला. त्याबद्दल सर्वसामान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
--------------
आता पुन्हा लॉकडाऊन नको...
गेल्या वर्षी कोरोनाची साथ सुरू झाली तेंव्हा आधी केंद्राने आणि नंतर राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्याचे बरे-वाईट परिणाम सगळ्यांनी विशेषतः सर्वसामान्य लोकांनी भोगले. आता पुन्हा बाधितांची संख्या वाढत आहे. (खरंच? सरकारी कामकाज संशयास्पद आहे!) म्हणून लॉकडाऊन करणे म्हणजे शासन आणि प्रशासनाने जबाबदारी टाळणे होईल. लोक ऐकत नाहीत ही सबब शासनाने सांगू नये, उपाययोजना करावी. गर्दी टाळण्यासाठी करण्यासारखे खूप काही आहे. सत्ता आणि यंत्रणा ताब्यात असलेले शासन ते करू शकते. पण, इच्छाशक्तीचा अभावच दिसतोय.
- मकरंद जोशी, पर्यटन व्यवसायिक
........
आर्थिकदृष्ट्या लॉकडाऊन परवडणारा नाही, कारण ठाण्यात हातावर पोट असणारे शेकडो लोक आहेत. त्याला पर्याय म्हणून काही निर्बंध घालता आले तर योग्य होईल. आता कुठे व्यवसाय, उद्योग नीट सुरळीत होऊ लागले असताना, हा पर्याय पुन्हा अनेक अडचणी वाढवणारा ठरू शकतो.
- डॉ. क्षितिज कुलकर्णी, ज्येष्ठ लेखक, नाट्य दिग्दर्शक
........
आर्थिकदृष्ट्या पाहिले तर लॉकडाऊन नकोच. पहिल्या लॉकडाऊनमध्ये खूप नुकसान झाले आहे. आता कुठे तरी आपण हळूहळू बाहेर येतोय. पण, प्रत्येक वेळी लॉकडाऊन हा पर्याय नाही. लोक बिनामास्कचे बिनधास्त फिरताना दिसत आहेत. त्यांना कठोर शासन करण्याची गरज आहे. काही लोकांमुळे सरसकट सगळ्यांना लॉकडाऊनचा भुर्दंड कशाला?
- शैलेश हजारे, लेक्चरर
........
लाॅकडाऊन नको... शिस्त हवी!
गेल्या ९-१० महिन्यांत कोरोना महामारीमुळे कित्येक लोकांची उपासमार झाली. अनेक शाळा-महाविद्यालयांतील विनाअनुदानित शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक शिक्षकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी इतर मार्ग अवलंबले आहेत. लाॅकडाऊनमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गरिबांच्या घरात दोन वेळचे कसेबसे सरकारने पुरविले; पण, अनेक प्रश्न निर्माण झाले.. त्याची उत्तरे नाहीत.
- प्रा. एकनाथ पवळे, अध्यक्ष, निसर्ग क्रीडा संवाद - ठाणे.
...
पुन्हा लॉकडाऊन नकोच. कारण आता अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे. जनसामान्य माणूस आधीच अनेक जबाबदाऱ्यांखाली आणि महागाई, कर इत्यादीने वाकला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना लॉकडाऊन परवण्यासारखे नाही. एवढेच नाहीतर, लोक याच्या विरोधात आहेत आणि जर जबरदस्ती झाली तर लोक आंदोलन करतील. त्यापेक्षा सरकारने त्यावर ठोस निर्णय घ्यायला हवे.
- सुमुख राजे, व्यवस्थापक, खाजगी कंपनी