ठाण्याची वाटचाल डिजिटलकडे
By Admin | Updated: June 3, 2016 01:54 IST2016-06-03T01:54:23+5:302016-06-03T01:54:23+5:30
ठाणे शहराने इस्रायलच्या मदतीने डिजिटल ठाणे करण्याचा बहुमान मिळवला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि इस्रायली दूतावासाचे वाणिज्यदूत डेव्हिड अकोव्ह यांच्यात

ठाण्याची वाटचाल डिजिटलकडे
ठाणे : ठाणे शहराने इस्रायलच्या मदतीने डिजिटल ठाणे करण्याचा बहुमान मिळवला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि इस्रायली दूतावासाचे वाणिज्यदूत डेव्हिड अकोव्ह यांच्यात गुरुवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ‘डीजी ठाणे’ हा प्रकल्प राबवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. इस्रायलमधील तेलअवीवच्या धर्तीवर इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे ठाण्याला देशातील पहिले डिजिटल शहर बनण्याचा मान मिळणार आहे.
पालिकेच्या नागरी संशोधन केंद्रामध्ये गुरुवारी झालेल्या या बैठकीला तेलअवीव पालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी जोहार शेरॉन, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, इस्रायलच्या टीएसजी आयटी सिस्टीमचे सेल्स व मार्केटिंग डायरेक्टर डेव्हिड ग्रुप, एचडीएफसी बँकेचे गौतम उपस्थित होते.
एचडीएफसी बँकेच्या व्हिसाकार्डच्या धर्तीवर या प्रकल्पासाठी प्रीपेडकार्डचा वापर करण्यात येणार असून हे युटिलिटी डीजी कार्ड ग्राहकांच्या आधारकार्ड आणि बँक खात्याशी संलग्न करण्यात येणार आहे. या कार्डाचा वापर सर्वसाधारणपणे क्रेडिट किंवा डेबिटकार्डसारखाच करता येणार असून या कार्डाच्या माध्यमातून धारकास विविध सेवांचे देयक, विविध कर, परिवहन सेवेचे तिकीट आदी सेवांची बिलेभरणे शक्य होणार आहे. तसेच खरेदीही करता येणार आहे. (प्रतिनिधी)