ठाणे- मुंबईच्या वाहतूककोंडीतील टोलमुक्ती ठरणार दहा कोटींची

By जितेंद्र कालेकर | Published: August 21, 2018 11:30 PM2018-08-21T23:30:45+5:302018-08-21T23:30:45+5:30

Thane: Toll emancipation in Mumbai's traffic conglomerate will be 10 crores | ठाणे- मुंबईच्या वाहतूककोंडीतील टोलमुक्ती ठरणार दहा कोटींची

एमईपी करणार क्लेम

Next
ठळक मुद्दे गणेशभक्तांमध्येही आनंदवाहन चालकांनी केले स्वागत एमईपी करणार क्लेम

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे एमएसआरडीसीने ऐरोलीसह मुलुंड चेकनाका येथील दोन असे तीन टोलनाक्यांवरून जाणाऱ्या लहान (हलक्या) वाहनांना टोलमधून मुक्त केले आहे. यातून पैसा आणि वेळही वाचणार असल्यामुळे ठाणे आणि मुंबईतील वाहन चालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर टोल वसूली करणारी ‘एमईपी’ खासगी संस्था मात्र यातून बुडणा-या सात ते दहा कोटींच्या उत्पन्नाचा ‘क्लेम’ राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंब्रा येथे बायपासचे काम महिनाभर लांबणीवर गेले आहे. वाहतुकीचा हा ताण ठाणे शहर आणि ठाणे ते मुंबई तसेच मुंबई ते ठाणे जाणा-या वाहतुकीवर आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहरात वाहतूककोंडीचे चित्र होते. यातून ठाणेकरांची सुटका होण्यासाठी एमएसआरडीसीचे मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ऐरोलीसह मुलुंड चेकनाका आणि कोपरी आनंदनगर अशा तीन्ही टोल नाक्यावरुन टोल वसूलीतून लहान वाहनांना मुक्त केले आहे. ही टोल माफी २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर २०१८ या दरम्यान राहणार आहे. त्यामुळे शेकडो वाहन चालकांना किमान महिनाभर तरी टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. तसेच वाहतूककोंडीतील वेळही वाचणार असल्यामुळे अनेक वाहन चालकांनी या राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. मंगळवारी मध्यरात्रीपासून अमलात आलेल्या निर्णयामुळे केवळ मोठ्या वाहनांनाच टोल भरावा लागणार आहे. पण ज्यांना अजूनही याची पूर्ण माहिती नाही. ते मंगळवारी टोल भरण्यासाठी टोलच्या केबिनजवळ काही सेकंद गाडी उभी करीत होते. त्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.
............................
एकाच मिनिटांमध्ये गेली १६० वाहने सुसाट
टोल माफी झाल्यानंतर कोपरीच्या आनंदनगर जवळील मुलुंड टोलनाका येथील एका मार्गिकेवरून एका मिनिटाला २५ लहान (कार) वाहने गेली. याच न्यायाने चार मार्गिकांवरून जाणारी १०० वाहने येथून गेल्याचे आढळले तर मुंबईकडून ठाण्याकडे येणारी एका मिनिटात १५ वाहने येत होती. याच न्यायाने चार मार्गिकांवरुन ६० वाहनांनी टोल न भरता प्रवेश केला. दिवसभरात अशी हजारो वाहने या मार्गावरून गेली.
...................................
काय म्हणताहेत वाहन चालक...
टोल माफी मिळण्यापूर्वी केवळ टोल भरण्यासाठी मुलुंड येथे एक तास वाहतूककोंडीमध्ये वाया जात होता. दहा मिनिटांच्या प्रवासाला तासभर लागायचा. रोज भांडूप येथून मला ठाण्यात यावे लागते. वाहतूककोंडीला कंटाळून मी दुचाकीवरून येत होतो. या टोल माफीमुळे वेळ वाचेल. या निर्णयामुळे खूप समाधान वाटले.
निलेश रावराणे, भांडूप.
.......................
माझे क्लिनिक ठाण्याच्या आनंदनगर येथे आहे. राहायला घोडबंदर रोडवर असल्यामुळे हा मार्ग रोजच्या प्रवासाचा आहे. मुंबईत विक्रोळीकडे जातानाही दीड तास खर्च होत होता. तात्पूरती केलेली टोलमाफी कायमची व्हावी, अशी अपेक्षा आहे.
डॉ. नितीन माने, कोपरी, ठाणे.
................................
टोलमाफीचा निर्णय अत्यंत चागला आहे. टोलमुळे वाहतूककोंडीमध्ये एक ते दीड तास वाया जात होता. टोलसाठी पैसेही द्यायचे आणि वेळही जात होता. वाहतूककोंडी आणि टोलच्या भुर्दंडातून एक महिना तरी सुटका मिळेल.
संदीप शिंदे, अभियंता, ठाणे.
............................
रोज किती वाहने जातात, किती महसूल जमा होतो, याची माहिती रोज एमएसआरडीसीकडे आहे. शिवाय, रोज यात आकडेवारी बदलत असते. पण एक महिन्याच्या टोल माफीतून एमइपीला सात ते दहा कोटींचा फटका बसणार आहे. हा क्लेम राज्य सरकारशी चर्चा करून केला जाणार आहे.
जयंत म्हैसकर, व्यवस्थापकीय संचालक, एमईपी, (रस्ता दुरुस्ती आणि टोल वसुलीचे प्रमुख ठेकेदार) मुंबई.
...................................
मासिक पास धारकांचे काय?
हलक्या वाहनांना २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत ही टोलमाफी दिली आहे. पण ज्यांनी टोलचा मासिक पास काढला आहे. अशा वाहन चालकांना मुदतवाढ दिली जाणार का? असा सवालही काही ठाणेकरांनी यावेळी उपस्थित केला.
..........................
कायमस्वरुपी टोलमाफी व्हावी- अनंत तरे
टोलमुक्तीचे वाहनचालकांच्या वतीने शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. ही टोलमुक्ती केवळ एक महिना नव्हे तर कायमस्वरुपी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गेल्या २२ वर्षातील ठाणे ते नवी मुंबईच्या टोलचा हिशेब केला तर दुसरा नवीन पूल उभा राहू शकला असता इतका टोल वसूल झाल्याचा टोलाही त्यांनी शिवसेना -भाजपच्या मंत्र्यांना लगावला.

Web Title: Thane: Toll emancipation in Mumbai's traffic conglomerate will be 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.