ठाण्यात यंदा बाजीरावाच्या रूपातील गणेशमूर्ती
By Admin | Updated: July 10, 2016 04:21 IST2016-07-10T04:21:32+5:302016-07-10T04:21:32+5:30
एखादी मालिका असो किंवा चित्रपट, त्याचा प्रभाव गणेशोत्सवावर, त्याच्या देखाव्यांवर हमखास दिसतो. गेल्या वर्षी ‘जय मल्हार’ मालिकेमुळे खंडेरायाच्या आणि ‘बाहुबली’च्या प्रभावाखाली

ठाण्यात यंदा बाजीरावाच्या रूपातील गणेशमूर्ती
- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
एखादी मालिका असो किंवा चित्रपट, त्याचा प्रभाव गणेशोत्सवावर, त्याच्या देखाव्यांवर हमखास दिसतो. गेल्या वर्षी ‘जय मल्हार’ मालिकेमुळे खंडेरायाच्या आणि ‘बाहुबली’च्या प्रभावाखाली असलेल्या मूर्तिकारांनी बाहुबली गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. यंदाच्या गणेशोत्सवात बाजीरावाच्या रूपातील गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. केवळ सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नव्हे, तर घरगुती गणेशोत्सवासाठीही या मूर्तींची आतापासून चौकशी होत आहे.
सप्टेंबर महिन्यात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. दोन महिन्यांच्या या काळात सर्व कामे पूर्ण व्हावी, त्यातही मंडळांच्या मूर्तींची कामे दीड महिन्यातच आवाक्यात यावी, यासाठी कार्यशाळेत मूर्तिकारांसह कारागिरांची लगबग दिसते आहे. ८० टक्के लहान गणेशमूर्तींचे रंगकाम पूर्ण झाले आहे. भव्य गणेशमूर्तींच्या रंगकामाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवावर ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाचा पगडा दिसून येणार आहे. गेली तीन वर्षे ‘जय मल्हार’च्या रूपातील गणेशमूर्तीला, तर गेल्या वर्षी गणेशभक्तांनी ‘बाहुबली’ गणेशाला पसंती दिली होती. यंदा मात्र बाजीरावाच्या रूपातील गणेशमूर्तीला मागणी आहे. भक्तांच्या मागणीनुसारच यंदा या प्रकारची गणेशमूर्ती बनवली जात असल्याचे मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पाच फुटांच्या तर घरगुती गणेशोत्सवासाठी दीड फुटापासून तीन फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. घरगुती गणेशोत्सवासाठी अशी मूर्ती घेण्याकडेही कल आहे.
यंदा पावसाचा अडथळा नाही
पावसाचा जोर वाढला की, मूर्ती सुकवण्याची मोठी अडचण निर्माण होते आणि कैकदा वेळेत काम पूर्ण होत नाही. मूर्ती सुकवण्यासाठी कारागिरांच्या कामाचे तास वाढतात. मग, कोळशाच्या शेगड्या, हॅलोजन यांच्या साहाय्याने मूर्ती सुकवाव्या लागतात. यंदा पावसाचा जोर कमी असल्याने पावसाचा परिणाम मूर्तींवर झाला नसल्याचे बोरीटकर यांनी सांगितले.
माऊली आणि ब्रह्मकमळ
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींमध्ये गणेशमूर्तीमागे वेगवेगळी आरास केली जाते. यंदा पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर माऊली गणपती गणेशभक्तांच्या भेटीला येत आहे. ब्रह्मकमळाचा देखावा असलेला गणपतीही कार्यशाळेत पाहायला मिळतो. कमळावर ब्रह्मा, विष्णू, महेश दाखवण्यात आले आहे.