लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : वेगाने वाहणारा वारा.. अंधार.. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे ४६ कि.मी.चे सागरी अंतर यशस्वीपणे पार करुन ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मानव मोरे, आयुष तावडे व आयुषी आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचा सन्मान करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे हे तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करीत आहे. मानव मोरे, आयुष तावडे, आयुषी आखाडे या तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स (English Channel) हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होवून पार केले. Pride of India चे A व B हे दोन भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेले होते. Pride of India च्या A संघामध्ये ठाण्याच्या मानव राजेश मोरे वय वर्षे २० याची तर Pride of India च्या B संघामध्ये आयुष प्रवीण तावडे वय वर्षे १५ व आयुषी कैलास आखाडे वय वर्षे १४ यांची निवड झाली होती.
१६ जून २०२५ रोजी Pride of India च्या A मधील जलतरणपटूंनी इंग्लीश खाडी पोहण्यास सुरूवात केली. या संघातील मानव राजेश मोरे यांनी ४६ कि.मी.चे सागरी अंतर रिले पध्दतीने १३ तास ३७ मिनिटात पूर्ण केले. तर १८ जून रोजी Pride of India च्या B च्या संघातील आयुष प्रवीण तावडे वय वर्षे १५ व आयुषी कैलास आखाडे वय वर्षे यांनी हे अंतर ११ तास १९ मिनिटात पूर्ण केले. या तिन्ही जलतरणपटूंचे आज खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हे तिन्ही जलतरणपटू इंग्लंडला जाण्यापूर्वी नियमित ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करीत होते. तसेच इंग्लंड, फ्रान्स येथील वातावरणाचे तापमान लक्षात घेवून त्याची सवय व्हावी या दृष्टीने खाजगी तरणतलावात बर्फाच्या लाद्या टाकून जलतरणाचा सराव केला. अथक मेहनत आणि नियमित सराव यामुळेच हे यश प्राप्त केले असल्याचे तिन्ही जलतरणपटूंनी सांगितले. यावेळी त्यांचे पालक रुचिता मोरे, राजेश मोरे, प्रवीण तावडे, कैलास आखाडे उपस्थित होते.
'ती'च्या जिद्दीला सलाम
आयुषी कैलास आखाडे या १४ वर्षीय जलतरणपटूला इंग्लंड येथे जाण्यापूर्वी पायाला दुखापत झाली होती. तिच्या पायाला ११ टाके पडल्यामुळे तिचा सराव पूर्णपणे बंद झाला होता. पायाची जखम जेमतेम भरली असल्याने तिला डॉक्टरनी पोहण्यास परवानगी दिली. तिने जिद्दीने हे सागरी अंतर ११ तास १९ मिनिटात पूर्ण केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.