Thane: शिंदे सेनेची उल्हासनगर, अंबरनाथ शहरातील कार्यकारिणी बरखास्त, नवी कार्यकारिणी लवकरच
By मुरलीधर भवार | Updated: July 17, 2024 19:20 IST2024-07-17T19:19:06+5:302024-07-17T19:20:28+5:30
Shiv Sena News: लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे सेनेने उल्हासनगर, अंबरनाथ आणि महिला आघाडीच्या कार्यकारणीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या आदेशाने उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील कार्यकारिणी बरखास्त केली आहे.

Thane: शिंदे सेनेची उल्हासनगर, अंबरनाथ शहरातील कार्यकारिणी बरखास्त, नवी कार्यकारिणी लवकरच
- मुरलीधर भवार
कल्याण - लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे सेनेने उल्हासनगर, अंबरनाथ आणि महिला आघाडीच्या कार्यकारणीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या आदेशाने उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील कार्यकारिणी बरखास्त केली आहे. गुरूवारी अंबरनाथ आणि शुक्रवारी उल्हासनगर शहरातील नव्या नेमणुकांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष लक्ष पक्षबांधणीसाठी घातले आहे. ते स्वतः यावेळी उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार शिंदे हे विजयी झाले. त्यांच्या या विजयामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. आत्ता विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणूकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी शिंदे सेनेची आपली पक्षीय ताकद आणखी वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून उल्हासनगर, अंबरनाथ शहरातील शहर आणि महिला आघाडीची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. आता दोन्ही शहरांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कार्यकारिणीची पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी गुरूवार १८ जुलै रोजी अंबरनाथ येथील पूर्वेतील पनवेलकर सभागृहात आणि १९ जुलै रोजी उल्हासनगरच्या कॅम्प एक येथील गुरूद्वारा सभागृहात मुलाखतींचे आयोजन सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. यात पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.