ठाणे ग्रामीण लेप्टोसदृश्य तापाने फणफणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:04 IST2020-11-25T00:03:52+5:302020-11-25T00:04:18+5:30
आराेग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ

ठाणे ग्रामीण लेप्टोसदृश्य तापाने फणफणले
मुरबाड : तालुका कोरोना संक्रमणाच्या भीतीतून सावरत असतानाच आता लेप्टोसदृश्य तापाने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुरबाड तालुक्यात आतापर्यंत या आजाराने १२ ते १६ रुग्ण दगावले आहेत. तर शहापूरमध्येही असाच प्रकार सुरू असल्याचे आढळल्यामुळे आराेग्य यंत्रणेसमाेर चिंतेचे वातावरण आहे.
मुरबाड तालुक्यात १,१४८ कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात कोरोना रुग्ण सापडणे बंद झाल्याने कोविड सेंटर बंद केले आहेत. मात्र, काेराेनाचे संकट जात नाही ताेच लेप्टोसदृश्य आजाराने डाेके वर काढले आहे. अचानक ताप येणे, हुडहुडी भरणे, डोके जड होणे, डोळे लाल होणे, पाठीत दुखणे, सांधे दुखणे, खांदे आखडणे, उलटी होणे, तोंडातून रक्त पडणे, रक्तातील पेशी कमी होणे, लिव्हर व किडनी निकामी होणे यांसारख्या व्याधी आढळत आहेत. तीन ते पाच दिवस हा आजार अंगावर काढल्यास मृत्यू ओढवत आहे. डॉक्टरही या आजाराविषयी खात्रीशीर सांगू शकत नाहीत. काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, एखादी पूरसदृश्य परिस्थिती होऊन गेल्यानंतर जी महामारी सुरू होते त्या प्रकारची ही साथ आहे. तर काहींच्या म्हणण्यानुसार, या ताप-थंडीवर डॉक्टर चुकीचे उपचार करीत असून कोरोना संक्रमणातील उपचार केले जात असल्याने किडन्या निकाम्या होऊन रुग्ण दगावत आहेत. तर वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे हे आजार बळावले असल्याचेही बोलले जात आहे. एका महिन्यात मुरबाड, शहापूर, कल्याण ग्रामीणमधून जवळपास ४६ लोकांचा या आजाराने बळी गेला आहे. मयत झालेल्यांमध्ये २० ते ५० च्या दरम्यान वय असणाऱ्यांचा अधिक समावेश असल्याने या तिन्ही तालुक्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवा आजार हा डेंग्यू किंवा लेप्टो स्पायरोसिसचा प्रकार असावा. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक संपर्क ठेवावा. आजार अंगावर काढू नये. शासकीय रुग्णालयात चांगले उपचार होतात. त्यामुळे काही लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत.
- डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे