‘सनातन’वरील आरोपांविरोधात ठाण्यात निषेध मोर्चा
By Admin | Updated: October 5, 2015 02:29 IST2015-10-05T02:29:41+5:302015-10-05T02:29:41+5:30
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातनचे साधक समीर गायकवाड यांस संशयित म्हणून अटक केली. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

‘सनातन’वरील आरोपांविरोधात ठाण्यात निषेध मोर्चा
ठाणे : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातनचे साधक समीर गायकवाड यांस संशयित म्हणून अटक केली. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र, हिंदूविरोधी शक्ती, पुरोगामी मंडळी आणि राजकीय पक्षांनी पोलिसांची चौकशी आणि न्याययंत्रणेचे न्यायदान होण्याआधी ‘सनातन’वर बंदी घालण्याच्या मागणीस सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘सनातन’वर होणाऱ्या आरोपांविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी ठाण्यात रविवारी सायंकाळी निषेध मोर्चा काढला.
आरोपांच्या संदर्भातील संस्थेची भूमिका स्पष्ट होण्याआधी बंदीचा निर्णय घेणे म्हणजे ‘सनातन’वर मोठा अन्याय आहे. त्यामुळे पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी. राष्ट्रपे्रमी ‘सनातन’ला ‘बळीचा बकरा’न बनविता संभाव्य बंदीविरोधात शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली. गडकरी रंगायतन येथून निषेध मोर्चा राममारुती रोड, घंटाळीमार्गे चिंतामणी चौकापर्यंत नेण्यात आला. या मोर्चाला संबोधताना ते बोलत होते. यात शिवसेना, हिंदू गोवंश रक्षा समिती, श्री योग वेदान्त समिती, श्री संप्रदाय, अखिल भारतीय हिंदू महासभा, भारतीय युवा मोर्चा, हिंदू चेतना मंडळ, हिंदू राष्ट्र सेना, जयहिंद सेवा समिती, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वराज्य हिंदू सेना, हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समिती (चेंबूर), शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान, शिवकार्य प्रतिष्ठान, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था या संघटनांचे सुमारे १२०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी सनातनचे नंदकुमार जाधव, स्वाती खाड्ये आणि अनुराधा वाडेकर हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)