ठाणे पोलिसांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये १४३ आरोपींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 22:31 IST2021-11-12T22:30:21+5:302021-11-12T22:31:16+5:30
१४ फरार आरोपी जेरबंद; चार तासांत १५२ अधिकाऱ्यांनी राबविली मोहीम

ठाणे पोलिसांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये १४३ आरोपींवर कारवाई
ठाणे : ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशाने गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ या मोहिमेत अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या ६१ जणांसह १४३ आरोपींवर कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे अशी चार तास ही मोहीम ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात राबविल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी दिली.
ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हे ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तालयातील ३५ पोलीस ठाण्यांमधील विविध पथकांनी तसेच गुन्हे शाखेच्या दहा पथकांनी ११ नोव्हेंबर रोजी रात्री ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि अंबरनाथ परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांची चौकशी केली. यामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या १४ आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. अजामीनपात्र वॉरंट असलेल्या १५ आरोपींना अटक करण्यात आली. हद्दपार केलेले १८, तर रेकॉर्डवरील १४ आरोपींची धरपकड करण्यात आली. जुगार कायद्याखाली चौघांना तसेच दारुबंदी कायद्याखाली १४ जणांना अटक झाली. चार तासांतील या मोहिमेत रेकॉर्डवरील गुंडांची झाडाझडती घेण्यात आली. एकाच रात्रीमध्ये अमली पदार्थ विक्रीचे ६१ गुन्हे दाखल करून ६१ आरोपींना अटक झाली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सहा हद्दपार आरोपींना अटक केली. या मोहिमेमध्ये १५२ अधिकारी आणि ८३४ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.