ठाणे-पालघर जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:29 IST2018-11-24T00:29:12+5:302018-11-24T00:29:44+5:30
ठाणे-पालघर या दोन जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या मागील अडीच वर्षांत वाढताना दिसत आहे. या अडीच वर्षांत जवळपास दोन हजार ४०० जणांनी नेत्रदान केल्याने सुमारे एक हजार ४०० जणांना दृष्टी मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्रदान विभागाने दिली.

ठाणे-पालघर जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या वाढतेय
- पंकज रोडेकर
ठाणे : ठाणे-पालघर या दोन जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या मागील अडीच वर्षांत वाढताना दिसत आहे. या अडीच वर्षांत जवळपास दोन हजार ४०० जणांनी नेत्रदान केल्याने सुमारे एक हजार ४०० जणांना दृष्टी मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्रदान विभागाने दिली. यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ९२० टार्गेट दिले असून त्यापैकी ६३५ जणांनी नेत्रदान केल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे.
दरवर्षी शासनाकडून नेत्रदानाबाबत प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट दिले जाते. त्याचप्रमाणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत प्रत्येकी चारशेचे टार्गेट दिले होते. त्या टार्गेटपेक्षा ते अधिक पूर्ण केल्यानंतर २०१८-१९ या वर्षाकरिता ठाणे-पालघरला ९२० चे टार्गेट दिले गेले. त्यानुसार, एप्रिल ते आॅक्टोबरदरम्यान या दोन्ही जिल्ह्यांतून एकूण ६३५ जणांनी नेत्रदान केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेत्रदान होत असताना त्यातील सर्व नेत्र उपयुक्त ठरतील, असे नाही. त्यातील उपयुक्त असलेले नेत्र हे प्रतीक्षायादीतील एक हजार ३६९ व्यक्तींना लाभल्याने त्यांना दृष्टी मिळत आहे. अशा प्रकारे ठाणे, मुंबईतील लोकांना दृष्टी मिळाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.
अडीच वर्षांत दोन हजार ३७३ जणांनी नेत्रदान केले आहे. त्यामुळे १,३६९ जणांना या वर्षात दृष्टी मिळाली आहे. याबाबत राबवण्यात आलेल्या जनजागृतीचे हे फलित असल्याचे दिसते.
- डॉ. पी.के. देशमुख,
जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक, ठाणे