ठाणे आमचे माहेरघरच!
By Admin | Updated: May 23, 2016 02:35 IST2016-05-23T02:35:16+5:302016-05-23T02:35:16+5:30
‘ठाणे सोडून जाताना खूप वाईट वाटतंय. दीड महिना आम्ही इथे राहिलो. सर्व जण आपल्याच कुटुंबातील सदस्य वाटले. प्रत्येकाने आपलेपणा दाखवला. डोळ्यांतील अश्रू आवरेनासे झालेत.

ठाणे आमचे माहेरघरच!
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
‘ठाणे सोडून जाताना खूप वाईट वाटतंय. दीड महिना आम्ही इथे राहिलो. सर्व जण आपल्याच कुटुंबातील सदस्य वाटले. प्रत्येकाने आपलेपणा दाखवला. डोळ्यांतील अश्रू आवरेनासे झालेत. ठाणे म्हणजे जणू काही आमचे माहेरघरच झाले आहे,’ असे भरल्या डोळ्यांनी स्वाती चव्हाण आणि नलिनी गायकवाड या सांगत होत्या. दीड महिन्यापूर्वी ठाण्यातील गावदेवी मैदानात आलेल्या या दुष्काळग्रस्त कुटुंबीयांनी आनंदाश्रूंनी निरोप दिला.
दौण येथील खुटबाव गावातील दोन दुष्काळग्रस्त कुटुंबीयांना रोजगार मिळावा, या उद्देशाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परदेशी यांनी दीड महिन्यापूर्वी त्यांना ठाण्यातील गावदेवी मैदान येथे पिठलं-भाकरीचा स्टॉल सुरू करून दिला. त्या दिवसापासून प्रामाणिकपणाने या दोन कुटुंबीयांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पिठलं-भाकरीची चव केवळ ठाण्यातच नव्हे, तर डोंबिवलीकर, मुंबईकरांपर्यंत पोहोचली आणि दिवसेंदिवस या स्टॉलला प्रतिसाद वाढत गेला. जून महिना जवळ येत असल्याने त्यांनी रविवारी गावी जाण्याचे निश्चित केले आणि जाताना त्यांनी आपल्या भावना लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.
स्वाती चव्हाण आणि नलिनी गायकवाड या दोघी सांगत होत्या की, इथून जाताना माहेरहून सासरी जात असल्यासारखे वाटत आहे. सर्वांनी इतके प्रेम दिले की, पुन्हा कधी इकडे यायचे असेल तर कोणती अडचण येईल, असे वाटत नाही. कमलतार्इंनी जेव्हा शहराकडे येण्यास सांगितले, तेव्हा इथे येण्याआधी दोन दिवस खूप डोके दुखत होते. शहराकडे जायचे की नाही, हा प्रश्न सतावत होता. विचार करूनकरून डोके दुखू लागले होते. परंतु, आता हे ठाणे शहर आम्हाला घरासारखे झाले आहे. रविवारी सकाळपासून ठाणेकर भेटायला येत होते आणि तुम्ही आठ दिवस तरी थांबा, अशी विनवणी करीत होते. इकडून गावी गेल्यावर आम्हाला करमणार नाही, हे तितकेच खरे आहे. सुरुवातीला इथे आल्यावर भीती होती, धास्ती वाटायची. मध्यंतरीच्या काळात काही लोकांकडून त्रासही झाला. त्या वेळी असे वाटत होते की, नको ती भांडणे. सरळ गावी निघून जावे. परंतु, सर्वच ठाणेकर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आता आम्हाला बिनधास्त वाटतंय. इथून जाताना ठाणेकरांच्या आठवणींची शिदोरी घेऊन जात आहोत. सर्वांनी खूप जीव लावला. इतकं जवळ केलं की, आता कसलीच भीती वाटत नाही. पिठलं-भाकरी खाण्यासाठी ठाणेकरांनी कधी बोलवले, तर अर्ध्या रात्री निघणार. सकाळी ८ वाजल्यापासून ठाणेकरांची पिठलं-भाकरीसाठी रांग लागत होती. ती रात्री १२ वाजेपर्यंत असायची. पहिल्या दिवशी ज्या वेळी इथे आलो तेव्हा काय होईल, कसे होईल, असे वाटत होते. सुरुवातीचे आठ ते दहा दिवस हिशेब जमत नव्हता; परंतु ठाणेकरांनीच हिशेब करायला शिकवले. सर्वांपासून प्रेम, आदर, माया मिळाली, जी आजवर गावी कधीही मिळाली नाही. लोक इतकी जवळची झाली होती की, रोज पिठलं-भाकरी खाणारे लोक इथे येत असत. अनेक महिला स्टॉलवर येऊन कुटुंबातील ताई, माईसारख्या गप्पा मारायच्या. शहराची आम्हाला पहिल्यापासून धास्ती वाटायची, परंतु इथे आल्यावर वेगळाच अनुभव मिळाला आणि जो काही मिळाला, तो कायम मनात राहणारा आहे.
एकीकडे या दीड महिन्यात ठाणेकरांनी दिलेली साथ, याबद्दल या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद होता, तर दुसरीकडे ठाणेकरांना सोडून जात असल्याने त्यांचे अश्रू डोळ्यांतून घळाघळा वाहत होते.