ठाणे तलावांचे नाही, तर हातगाड्यांचे शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:38+5:302021-03-21T04:39:38+5:30
ठाणे : ठाणे शहर हे तलावांचे शहर राहिले नसून हातगाड्यांचे शहर झाल्याचे सभागृहास सांगून संबंधित सहायक आयुक्तांकडे वारंवार तक्रार ...

ठाणे तलावांचे नाही, तर हातगाड्यांचे शहर
ठाणे : ठाणे शहर हे तलावांचे शहर राहिले नसून हातगाड्यांचे शहर झाल्याचे सभागृहास सांगून संबंधित सहायक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची खंत महापालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत व्यक्त केली.
शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून, त्यावरदेखील कारवाई होत नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. यासंदर्भातील लक्षवेधीवर बोलताना प्रशासन अशा हातगाड्यांवर कारवाई करत नसेल तर आमच्या पद्धतीने हे प्रकरण तडीस लावू, असा इशाराच त्यांनी दिला. या लक्षवेधीवर शिवसेना नगरसेवकांसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनीदेखील फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले.
कोट्यवधींचे खर्च करून महापालिका पदपथ बनवते. मात्र, त्यावर फेरीवाले बसत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी शिवसनेच्या नगरसेविका मीनल संख्ये यांनी केली. हातगाडीवर कारवाई करताना एखाद्या नारसेवकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा फोन केल्यास ही बाब रेकॉर्डवर आणावी, याला आपले समर्थन असल्याचे भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सांगितले. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांच्या बाजूला अतिक्रमण विभागाची गाडी असूनही कारवाई होत नाही तर अनेक वेळा केवळ थातूरमातूर कारवाई केली जाते. स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरात बसणारे फेरीवाले ठाण्याच्या बाहेरचे असल्याचे भाजपचे नगरसेवक सुनश जोशी यांनी सांगितले.
रस्त्यावरच्या गाड्या हा केवळ अतिक्रमणाचा विषय नाही तर पदपथांवर चालताना नागरिकांना व्यवस्थित चालता आले पाहिजे याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी, असे संदीप लेले यांनी सांगितले. स्टॉलदेखील चुकीच्या जागेवर दिले जात असल्याचे सांगून फेरीवाल्यांना अर्ज मागवून तो दहा वर्षे ठाणेकर असावा ही अट टाकावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कापूरबावडीपासून रस्त्यावर हातगाड्या उभ्या असताना त्यांच्याकडून हप्ते घेतले जात असल्याचा आरोप देवराम भोईर यांनी यावेळी केला. याशिवाय प्रभाग समितीवरदेखील अशा फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.