ठाण्यातील भिवंडी शहरातील सरावली एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीत आज (७ नोव्हेंबर २०२५) सकाळी मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेचे प्रमुख साकिब खरबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील सरावली गावातील या कारखान्यात आज सकाळी ९ वाजता आग लागल्याची नोंद झाली. सुरुवातीला घटनास्थळी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या होत्या, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने ठाणे आणि कल्याण येथून अतिरिक्त अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या.
या आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अग्निशमन दलाचे जवान सध्या आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. सुदैवाने, या आगीच्या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर 'कूलिंग ऑपरेशन' केले जाईल. या ऑपरेशननंतरच आग लागण्याचे नेमके कारण तपासले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Web Summary : A major fire broke out at a factory in Bhiwandi's Saravali MIDC. Firefighters are battling the blaze. No casualties reported. The cause is under investigation.
Web Summary : भिवंडी के सरावली एमआईडीसी में एक कारखाने में भीषण आग लग गई। दमकल कर्मी आग बुझाने में जुटे। कोई हताहत नहीं। कारण की जांच जारी है।