महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी ठाणेनगरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2015 23:39 IST2015-08-21T23:39:07+5:302015-08-21T23:39:07+5:30
ठाणे महापालिका आयोजित २६ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून या स्पर्धेत २५ हजार स्पर्धक धावणार असल्याची माहिती

महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी ठाणेनगरी सज्ज
ठाणे : ठाणे महापालिका आयोजित २६ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून या स्पर्धेत २५ हजार स्पर्धक धावणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. ठाणे स्वच्छ व हिरवेगार करू या, या घोषवाक्याखाली ही स्पर्धा पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येत्या रविवारी सकाळी ६.३० वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेत २५ हजार स्पर्धक धावणार आहेत. विशेष म्हणजे सामाजिक संस्था, व्यापारी, सनातन संस्थेचे प्रतिनिधी, अधिकारी हेसुद्धा रन फॉर फन...साठी धावणार असल्याचेही महापौरांनी आवर्जून सांगितले. तर मॅरेथॉन मार्गावरील रस्त्यांची दोन वेळा पाहणी करण्यात आली असून त्या ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आल्याचेही ते म्हणाले.
या स्पर्धेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटू भाग घेणार असून त्यामध्ये सचिन पाटील, संतोष कुमार, राजेंद्र सिंह, करण सिंग, राहुल पाल, दीपक कुमार, नवीन हुडा, अभिमन्यू कुमार, किशोर गवाणे, युनूस खान, विजयमाला पाटील, मोनिका अत्रे, सविता राऊत, नीलम कदम, मनीषा साळुंखे, स्वाती गाढवे, ज्योती गवते, रोहिणी आदी खेळाडूंचा समावेश आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असून परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री दीपक सावंत, महाराष्ट्र हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदील सुमारीवाला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
(प्रतिनिधी)