ठाणे मनपाच्या शाळा दुरुस्तीसाठी ३९ कोटी
By Admin | Updated: September 11, 2015 23:23 IST2015-09-11T23:23:00+5:302015-09-11T23:23:00+5:30
ठाणे महापालिका शिक्षण मंडळ शाळांच्या दुरवस्थेची लोकमतने सविस्तर वृत्तमालिकेद्वारे चिरफाड केल्यानंतर प्रशासनाने १३४ शाळांच्या ८५ इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले होते.
ठाणे मनपाच्या शाळा दुरुस्तीसाठी ३९ कोटी
ठाणे : ठाणे महापालिका शिक्षण मंडळ शाळांच्या दुरवस्थेची लोकमतने सविस्तर वृत्तमालिकेद्वारे चिरफाड केल्यानंतर प्रशासनाने १३४ शाळांच्या ८५ इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले होते. त्यात ३१ शाळा या २५ ते ३० वर्षे जुन्या असल्याने त्यांच्या सर्वांगीण दुरुस्तीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने शिक्षण विभागाकडे दिला होता. मात्र, पालिकेची आर्थिक पत खालवल्याने यासाठी आवश्यक खर्च करणे पालिकेला शक्य नसल्याने दुरुस्तीचा हा प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबित होता. परंतु, आता या शाळांची दुरुस्ती करण्याचे पालिकेने निश्चित केले असून येत्या तीन वर्षांत २७ शाळांची तीन टप्प्यांत दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी ३९ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १२ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे महापालिकेच्या १२७ शाळा या ८५ इमारतींमध्ये भरतात. शहरातील जुन्या आणि जीर्ण इमारतींसंदर्भात ती इमारत राहण्यासाठी सुरक्षित आहे की नाही, याचा अहवाल संबंधित अभियंत्यांकडून स्ट्रक्चरल आॅडिट करून सादर करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या होत्या. पालिकेच्या मालकीच्या इमारतींसह या शाळा ज्या इमारतीमध्ये भरतात, त्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट पालिका स्वत:च करणार होती. यापैकी अन्य इमारतींचे ते झाले नसले तरी पालिका शाळांचे पूर्ण झाले असून यामध्ये ३१ शाळांच्या इमारती दुरुस्तीयोग्य असल्याचे या अहवालामध्ये नमूद केले होते. यापैकी ४ इमारती अतिधोकादायक असल्याने त्या रिकाम्या केल्या आहेत. तर, काही तोडल्या आहेत. यामध्ये कौसा, उथळसर, टेंभीनाका, येऊर येथील शाळांच्या इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे आता उरललेल्या २७ शाळांच्या इमारतींची दुरुस्ती तीन वर्षांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
५.१० कोटी नव्या इमारतींसाठी
पालिकेमार्फत प्रस्तावित केलेल्या ३९ कोटींमध्ये १.५ कोटी हे किरकोळ कामासाठी खर्च करण्यात येणार असून ५.१० कोटी हे नवीन शाळा बांधण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. ३९ कोटींपैकी पहिल्या वर्षी १२ कोटी, दुसऱ्या वर्षी १२ आणि तिसऱ्या वर्षी १४ कोटी खर्च करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
या २७ शाळांमध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील सर्वाधिक ९ शाळांचा समावेश असून त्याखालोखाल कळवा-मुंब्य्रात ६, कोपरी २, उथळसर २, नौपाडा १, वर्तकनगर १, वागळे २ आदींचा यात समावेश आहे.
या २७ शाळांमध्ये १० ते १२ हजार विद्यार्थी सद्य:स्थितीत शिक्षण घेत असून तेथे अनेक सुविधांची वानवा आहे. परंतु, आता लाद्यांपासून रंग, खिडक्या, शौचालये, भिंती, जिने आदींसह इतर सर्वच गोष्टींची दुरुस्ती केली जाणार आहे.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील ढोकाळी, वाघबीळ, मानपाडा, तरीचापाडा, मोघरपाडा, बाळकुम, आझादनगर, ओवळा, कासारवडवली.
वागळे इस्ेटट- शांतीनगर, सावरकरनगर
वर्तकनगर- शिवाईनगर,
कोपरी- कोपरी गाव, पारशेवाडी,
नौपाडा- दगडी शाळा
कळवा-मुंब्रा - आतकोनेश्वरनगर, कळवा पोस्ट आॅफिस, आनंदनगर, दिवा, महात्मा फुलेनगर, मुंब्रा मार्केट, देवीचापाडा ४उथळसर- राबोडीच्या दोन शाळांचा समावेश आहे.
शाळांची अवस्था अतिशय दयनीय
लोकमतने काही महिन्यांपूर्वी सविस्तर वृत्तमालिकेद्वारे महापालिका शाळांच्या दुरवस्थेबाबत चिरफाड केली होती. त्यानंतर, ज्या शाळांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे, परंतु त्या शाळा दुरुस्त होऊ शकतात, अशा शाळांच्या दुरुस्तीचा अहवाल तयार केला होता.परंतु, त्यासाठी जो आवश्यक निधी होता, तो मात्र केवळ पालिकेच्या तिजोरीत निधी नसल्याने हा प्रस्ताव रखडून होता. यासंदर्भातही लोकमतने वाचा फोडताच अखेर आता या शाळांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.