-अजित मांडकेठाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत करण्यात आलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निंदनीय असून, अशा वक्तव्यांमधून हिंदुत्वात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. मराठी आणि गुजराती हे दोन्ही समाज हिंदूच असून, भाषेच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी शिंदे गटाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. या उमेदवारांचे अभिनंदन करताना पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘सूर्याजी पिसाळ’ असा करत, मुंबई दोन गुजरात्यांच्या हाती देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना शिंदे म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की यांना मराठी माणूस आणि मुंबईची आठवण येते. भावनिक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करणे गरजेचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मुंबईसह महाराष्ट्रासाठी विकासकामांसाठी सुमारे दहा लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मुंबईचा विकास झाला, तर देशाचाही विकास होईल, या भूमिकेतून केंद्र सरकार मुंबईच्या प्रगतीला चालना देत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी नेमके कोणते ठोस काम केले, याचे उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उलट त्यांच्या काळात मुंबईतील मराठी माणूस शहराबाहेर ढकलला गेला असून, त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचा दावाही शिंदे यांनी केला. दरम्यान, उद्या मुंबईत महायुतीची पहिली जाहीर सभा होत असून, याच सभेतून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सात नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे नमूद करताना, त्यामध्ये सहा ‘लाडक्या बहिणींचा’ समावेश असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यामुळे महायुतीच्या विजयाचा शुभारंभ झाल्याचे त्यांनी म्हटले. बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत आत्मविश्वासात असल्यामुळेच विरोधकांनी माघार घेतली असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. ठाणेकर आणि शिवसेना हे अतूट समीकरण असून, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
Web Summary : Shinde accuses Thackeray of dividing Hindus with Modi remarks. He emphasizes Marathi-Gujarati unity and criticizes Thackeray's Mumbai focus shift before elections, highlighting the central government's ₹10 lakh crore investment in Maharashtra's development.
Web Summary : शिंदे ने ठाकरे पर मोदी की टिप्पणियों से हिंदुओं को विभाजित करने का आरोप लगाया। उन्होंने मराठी-गुजराती एकता पर जोर दिया और चुनाव से पहले ठाकरे के मुंबई ध्यान केंद्रित करने की आलोचना की, महाराष्ट्र के विकास में केंद्र सरकार के ₹10 लाख करोड़ के निवेश पर प्रकाश डाला।