ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवींना मारहाण
By Admin | Updated: February 17, 2016 03:26 IST2016-02-17T03:26:53+5:302016-02-17T03:26:53+5:30
ठाणे महापालिकेचे उपायुक्त तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी, तसेच त्यांचे अंगरक्षक आप्पासाहेब कांबळे यांना क्षुल्लक कारणावरून महापालिकेच्या मुख्यालयातच मारहाण झाल्याची घटना

ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवींना मारहाण
ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी, तसेच त्यांचे अंगरक्षक आप्पासाहेब कांबळे यांना क्षुल्लक कारणावरून महापालिकेच्या मुख्यालयातच मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वा. च्या सुमारास घडली. या प्रकरणी सुभाष ठोंबरे यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्या दालनात माहिती अधिकाराबाबतची सुनावणी सुरू होती. त्याच वेळी ठोंबरे आणि माळवी यांच्यात वाद झाला. तो इतका विकोपाला गेला की, चवताळलेल्या ठोंबरेंनी माळवींची कॉलरच धरली. या धुमश्चक्रीत त्यांची सोनसाखळीही त्यांनी तोडली. त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली.
ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शहरातील नागरिकांना ‘ठाणे गौरव’, तसेच अन्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ठोंबरे याने हे पुरस्कार कशाच्या आधारे देण्यात येतात, असा प्रश्न माहिती अधिकारात महापालिकेला विचारला होता.
त्यावर माळवींनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने ठोंबरे याने अपील दाखल केले होते. याच मुद्द्यावरून त्याने मंगळवारी त्यांच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. वाद वाढण्यापेक्षा माळवींनी त्याला अखेर तिथून जाण्याचा सल्ला दिला.
यानंतर त्याने रणखांब यांच्या दालनातच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या बचावासाठी सरसावलेले अंगरक्षक कांबळे यांनाही त्याने मारहाण केली.
या घटनेनंतर ठोंबरेला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात
आले. त्याच्याविरुद्ध जबरी चोरी करणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणून सरकारी नोकरावर हल्ला करणे, धमकी देणे, तसेच अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी दिली. (प्रतिनिधी)