Thane-Mumbaikar students' bet; Abacus, Mantle Arithmetic Competition: | ठाणे-मुंबईकर विद्यार्थ्यांची बाजी; अबॅकस, मेंटल अ‍ॅरिथमेटिक स्पर्धा :

ठाणे-मुंबईकर विद्यार्थ्यांची बाजी; अबॅकस, मेंटल अ‍ॅरिथमेटिक स्पर्धा :

ठाणे : मुंबई येथे रविवारी झालेल्या सोळाव्या राज्यस्तरीय अबॅकस आणि मेंटल अ‍ॅरिथमेटिक स्पर्धा २०२० यामध्ये गणितावरील आपले प्रभुत्व सिद्ध करत नऊवर्षीय सिद्धार्थ साबू (ठाणे) याच्यासह मीरा रोड, उल्हासनगर आणि वांद्रे येथील इतर तीन मुलांनी विजेतेपद मिळवले आहे. ठाणेकर सिद्धार्थने ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’ नामक ट्रॉफी पटकावली असून ३० हजारांचे रोख बक्षीससुद्धा मिळवले आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रातून ४ ते १४ वर्षे वयोगटांतील सुमारे ४००० यूएसएमएसच्या मुलांनी सहभाग नोंदवला होता. महत्त्वाची बाब म्हणजे अबॅकस आणि मेंटल गणित पद्धत वापरून फक्त आठ मिनिटांत २०० कठीण गणिते त्यांना सोडवायची होती. यात अंतिम चार विजेते हे मुंबईकर ठरलेत. मुंबईतील विविध यूएसएमएस केंद्रांचे हे विद्यार्थी आहेत. सिद्धार्थसह मीरा रोडच्या प्रेरणा अकादमी (फाउंडेशन मॉड्युल चॅम्पियन) मधील आदित्य सत्यनारायण गोड्स, उल्हासनगरच्या (कन्स्ट्रक्शन मॉड्युल चॅम्पियन) भव्य यूएसएमएस अकादमीचा रोनिल रवी अस्वाणी आणि वांद्रे पूर्वच्या अ‍ॅस्पायर अकादमीची (अ‍ॅडव्हान्स मॉडेल चॅम्पियन) शर्वरी दिनेश वेळकर हे स्पर्धेतील इतर विजेते ठरलेत. या तिघांना प्रत्येकी सहा हजार रुपये रोख मिळाले. त्याचबरोबर, ‘चॅम्पियन’ पुरस्कार म्हणून अतिरिक्त रोख रु. ३००० सुद्धा मिळाले.

यूएसएमएस इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्नेहल कारिया, डॉ. क्रि स च्यू-यूसी इंटरनॅशनल (मलेशिया) चे कार्यकारी संचालक, यूसी इंटरनॅशलनचे वॉँग झी आणि प्रिन्सिपल आॅफ पीडीएमपी आयईएस प्रायमरी स्कूलच्या अंजना रॉय या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.

सीबीएस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड यूएसएमएएस (मुंबई प्रदेश) मधील मास्टर फ्रॅन्चायझीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. सीबीएस एज्युकेशनचे संचालक सी.डी. मिश्रा यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यामागे अलौकिक बुद्धिमत्ता असलेले अबॅकस मुले शोधणे आणि त्यांना एक संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक मंच उपलब्ध करणे, हाच आमचा उद्देश असल्याचे सांगत मुलांना शुभेच्छा दिल्या.

यूएसएमएस म्हणजे युनिव्हर्सल कन्सेप्ट मेंटल अ‍ॅरिथमेटिक सिस्टिम (यूएसएमएस) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी संपूर्ण मेंदू विकास आणि मेंटल अ‍ॅरिथमेटिक प्रशिक्षणात सबंध जगात आघाडीवर आहे. ते ४ ते १४ वर्षे वयोगटांतील मुलांना अ‍ॅरिथमेटिकचे प्रशिक्षण देतात.

Web Title: Thane-Mumbaikar students' bet; Abacus, Mantle Arithmetic Competition:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.