वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणातही वाढ होत आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तसेच सुदृढ आरोग्यासाठीही सायकलींगचा वापर करणे हितकारक ठरणारे आहे. हाच संदेश देण्यासाठी ठाण्याचे पोलीस अधिकारी चंद्रकांत जाधव यांच्यासह काही तरुण मंडळींनी नुकतेच ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया हे ४७ किलोमीटरचे अंतर सायकल सफरीने पार केले.
प्रदूषण विरहित ठाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची ठाणे ते मुंबई सायकलसवारी
ठळक मुद्देब्लॉकबस्टर सायकल ग्रुपच्या सदस्यांचाही सहभागदोन तासांमध्ये पार केले ४७ किलोमीटरचे अंतरपर्र्यावरण दिनानिमित्त सायकल सफरीची जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाढत्या वाहनांमुळे होणारे वायूप्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायकलचा अधिकाधिक होणे अपेक्षित आहे. याची जनजागृती करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी नुकतीच ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) अशी सायकल सफर केली.वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, वाहन कोंडीवर नियंत्रण येण्यासाठी तसेच आरोग्य तंदुरुस्तीसाठी सायकलचा वापर केल्यास अनेक फायदे होऊ शकतात. हा सकारात्मक विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी आपण स्वत:पासून काहीशी सुरुवात करावी, या संकल्पनेतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्यासह ठाण्यातील होतकरु ब्लॉकबस्टर सायकल ग्रुप मधील संदेश राव, साजिद खाकीयनी, पवन मेमन, अनुराग नाईक, संजय मिश्रा, चिराग शहा, अजय सिंग, सचिन चौधरी आणि दिग्विजय गर्जे यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधत २ जून रोजी पहाटे ५.३० वाजता ठाण्याच्या तीन हात नाका ते मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया, नरीमन पॉइंट्स हे ४७ किलो मीटरचे अंतर दोन तासांनी सकाळी ७.३० वाजता पार केले. पर्यावरण संरक्षण, वाहतूक कोंडी, व्यक्तिगत स्वास्थ असे उद्देश यामागे असल्याचे जाधव यांनी सांगितले. सायकल रॅलीतून एक वेगळे समाधान मिळाल्याचेही साजिद खाकीयनी म्हणाले.जनसामान्यांप्रमाणे पोलिसांनीही हा आदर्श घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी सकाळी ६ ते ८ वाजताची पेट्रोलिंग ही सायकलवरच सुरु केली आहे. नाका आणि बंदोबस्त पॉइन्टसही ते सायकलवरुनच चेक करतात. त्यांचा हाच आदर्श आता अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनीही घेतला आहे.