Thane, Kalyan constituencies: Four rounds of elections are uneven | ठाणे, कल्याण मतदारसंघ : निवडणूक मैदानात चारचौघी लढल्या अन पडल्या
ठाणे, कल्याण मतदारसंघ : निवडणूक मैदानात चारचौघी लढल्या अन पडल्या

- अजित मांडके

ठाणे - जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आता तीन मतदारसंघ झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत चार महिलांना लढण्याची संधी मिळाली होती. परंतु त्या पराभूत झाल्या. त्यापैकी एका महिलेला समाजवादी पार्टीने उमेदवारी दिली होती तर २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याणमधून मनसेने एका महिलेला संधी दिली होती. २०१४ च्या निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून दोन महिला लढल्या होत्या.

ठाणे लोकसभा मतदारसंघाला इतिहास आहे. या मतदारसंघाची धुरा सांभाळत असतानाच १९९८ च्या निवडणुकीत तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांच्या समोर तत्कालीन लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने चंद्रिका केनिया यांना उमेदवारी दिली होती. स्थानिक उमेदवार म्हणून राजाराम साळवी यांना डावलून केनिया यांना उमेदवारी दिल्याने पहिल्यांदाच एका महिलेला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली होती. ‘दिल्ली मे सोनिया आणि ठाणे मे केनिया’, अशी त्या निवडणुकीत केनिया यांची घोषणा होती. त्यामुळे या निवडणुकीत त्या काही तरी कमाल करतील अशी शक्यता वाटत होती. परंतु कॉंग्रेसने समाजवादीला दिलेल्या या संधीचा फायदा घेता आला नाही. उलट केनिया यांची उमेदवारी शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्या पथ्यावरच पडली. तब्बल दोन लाख ४९ हजार ५८९ (५,५३,२१०) मतांची आघाडी घेवून परांजपे पुन्हा दणदणीत विजयी झाले. केनिया यांना तीन लाख तीन हजार ६३१ मते मिळूनही पराभव पत्करावा लागला. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अ‍ॅड. राहुल हुमणे यांना (२४,७०५) तिसऱ्या क्रमांकाची तर अरूण गवळी संस्थापक अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय सेनेचे उमेदवार शरद वासुदेव नाईक यांना (११,६७३) चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. नॅशलन पँथर पार्टी, इंडियन युथ मुस्लीम लीग या राजकीय पक्षांसह दहा अपक्ष उमेदवार १९९८च्या निवडणूक रिंगणात होते. परंतु त्यानंतर केनिया यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन विधानसभा निवडणूक लढविली आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भुषवले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन २००१-२००२ च्या सुमारास राज्यसभेत प्रवेश केला होता.

या निवडणुकीनंतर सुमारे १३ महिन्यांच्या कालावधीत केंद्रातील भाजपा सरकार पडले आणि परांजपे यांना १९९९ च्या निवडणुकीला तोंड द्यावे लागले. वर्ष दोन वर्षाने निवडणुका लादल्या गेलेल्या असतानाही गतवेळी मतदारांच्या पसंतीला उतरलेले परांजपे यांची उमेदवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ठेवली. परंतु कॉंग्रेसने ही जागा पुन्हा आपल्याकडे घेतली. त्यामुळे चंद्रीका केनिया यांना पुन्हा संधी मिळाली नाही.

दरम्यान, ठाणे लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यानंतर वेगळ्या झालेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेना विरुध्द राष्टÑवादी आणि मनसे असा सामना रंगला. या निवडणुकीत शिवसेनेकडून प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे यांनी, तर राष्टÑवादीकडून वसंत डावखरे यांनी ही निवडणूक लढवली.

२00९ मध्ये मनसेने प्रथमच लोकसभा निवडणूक लढवली आणि वैशाली दरेकर यांना संधी दिली. एक कणखर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. महिला असूनही त्यांनी पुरूष पुढाऱ्यांना टक्कर देत आंदोलनांच्या माध्यमातूनही एक वेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळेच मनसेने त्यांच्यावर विश्वास टाकला होता.

या नव्या मतदारसंघात पहिल्यांदाच एका महिलेचा सामना १३ पुरुष उमेदवारांशी झाला होता. अशा स्थितीतही त्यांनी तिसºया क्रमांकाची मते मिळवली होती. दरेकर यांना १ लाख २ हजार ६३ मते मिळाली होती. २०१४ मध्ये कल्याण लोकसभेत रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीने सुलोचना सोनकांबळे रिंगणात होत्या.

सोनकांबळे यांना १ हजार २२९ मते मिळाली. यावेळी अपक्ष म्हणून अस्मिता पुराणिक यांनीही निवडणूक लढवली होती. त्यांना १ हजार २४३ मते मिळाली. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचेनंतर वेगळ्या झालेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात मागील दोनही निवडणुकीत महिलांना संधी मिळालेली नाही.


Web Title: Thane, Kalyan constituencies: Four rounds of elections are uneven
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.