Thane: वीजबिल भरण्याची थाप; ॲप डाउनलोड केले, गेले १.६१ लाख, गुन्हा दाखल
By जितेंद्र कालेकर | Updated: October 27, 2023 22:14 IST2023-10-27T22:12:38+5:302023-10-27T22:14:33+5:30
Crime News: वीजबिल थकल्याची बतावणी करीत ठाण्यातील मनोरमानगरातील महेशप्रसाद यादव (३६) या चालकाच्या बँक खात्यातून एक लाख ६२ हजारांची रक्कम परस्पर ऑनलाइन काढण्यात आली.

Thane: वीजबिल भरण्याची थाप; ॲप डाउनलोड केले, गेले १.६१ लाख, गुन्हा दाखल
- जितेंद्र कालेकर
ठाणे - वीजबिल थकल्याची बतावणी करीत ठाण्यातील मनोरमानगरातील महेशप्रसाद यादव (३६) या चालकाच्या बँक खात्यातून एक लाख ६२ हजारांची रक्कम परस्पर ऑनलाइन काढण्यात आली. याप्रकरणी सायबर भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी दिली.
मनोरमानगरातील रहिवासी यादव हे १७ ऑक्टाेबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी हाेते. त्यावेळी त्यांना अज्ञात मोबाइलधारकाने वीजबिल पेंडिंग असून, ते भरा, असा व्हॉट्सॲपवर मेसेज केला. बिल भरण्यासाठी क्लिक सपोर्ट हे ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्यावरूनच दहा रुपये त्यांना पाठविण्यास सांगितले. त्यानंतर या भामट्याने यादव यांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यातून एक लाख ६२ हजारांची रक्कम परस्पर ऑनलाइन वळती करून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे यादव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी माहिती व तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ प्रमाणे २६ ऑक्टाेबरला कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बी. के. कोल्हापुरे करीत आहेत.