ठाणे: जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पाच पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी, जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग आणि पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाने यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील १४ जुलै रोजीचा आदेश व त्याचा मसुदा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तसेच कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ येथील तहसिलदार व पंचायत समिती कार्यालयांच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना करण्यासाठीची अंतिम मुदत २१ जुलै घोषित करण्यात आली आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेला हा मसुदा, राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेले अधिकारी — जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे — यांच्या १४ जुलैच्या आदेशानुसार विचाराधीन धरला जाईल. या आदेशाच्या मसुद्यावर कोणाला हरकत किंवा सूचना असल्यास, त्या संबंधित सकारण लेखी निवेदने, हरकती किंवा सूचना २१ जुलै पर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर कराव्यात. यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती, सूचना किंवा निवेदने विचारात घेतले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.