Thane: ठाण्यात पावसाचे डबल शतक; तक्रारींचे अर्धशतक, या वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद
By अजित मांडके | Updated: July 20, 2023 13:21 IST2023-07-20T13:21:00+5:302023-07-20T13:21:16+5:30
Thane Rain Update: गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाचा कहर सुरू असताना, गेल्या चोवीस तासात २१३.८४ मिमी पावसाची नोंद ठाणे शहरात झाली आहे. ही नोंद या वर्षातील सर्वाधिक असून २८ जून २०२३ रोजी ही २००.०८ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.

Thane: ठाण्यात पावसाचे डबल शतक; तक्रारींचे अर्धशतक, या वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद
- अजित मांडके
ठाणे - गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाचा कहर सुरू असताना, गेल्या चोवीस तासात २१३.८४ मिमी पावसाची नोंद ठाणे शहरात झाली आहे. ही नोंद या वर्षातील सर्वाधिक असून २८ जून २०२३ रोजी ही २००.०८ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. तर गतवर्षी याच दिवशी १३५५.२२ मिमी तर यावर्षी १५०१.९९ मिमी पाऊस झाल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. यंदा जरी उशीर पाऊस सुरू होऊनही १४६.७७ मिमी जास्त पाऊस झाला आहे. तर दुसरीकडे जरी तक्रारींचा पाऊस पडल्याचे दिसत असले तरी २८ जून पेक्षा २० तक्रारी कमीच आहेत. या चोवीस तासात ६८ तर २८ जून रोजी ८८ तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षात नोंदवल्या गेल्या आहेत. यामुळे पावसाच्या डबल शतक आणि तक्रारींच्या अर्धशतकाने पावसाच्या जोर दिसून येत आहे.
हवामान खात्या अतिवृष्टीचा इशारा ठाणे- पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना दिला असताना, गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरी भागात पावसाने आपली दमदार बॅटिंग करणे सुरूच ठेवले आहे. गेल्या चोवीस तासात बरसलेल्या पावसाने या वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद केली आहे. वीस दिवसांपूर्वी पडलेला पाऊस जरी २००.०८ मिमी बरसला होता. त्यापेक्षाही गेल्या चोवीस तासात १३.७७ मिमी अधिक पाऊस पडला आहे. त्या चोवीस तासांपैकी ९ तासात प्रति तास १२.७० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त मिमी पाऊस झालेला आहे. तर गुरुवारी सकाळपासून त्याचे ते बरसने अजूनही सुरूच आहे.
तक्रारींचे दमदार अर्धशतक ; ३० झाडे कोसळली
या वर्षात तक्रारींचे हे दुसरे अर्धशतक आहे. वीस दिवसांपूर्वी ८८ तक्रारींची नोंद झाली होती. त्यामध्ये सर्वाधिक पाणी साचण्याचा तब्बल ३८ तक्रारी होत्या. तर १९ झाडे आणि ११ झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचा तक्रारी होत्या. तर दोन ठिकाणी त्यावेळी दरड कोसली होती. गेल्या चोवीस तासात जरी २० ने तक्रारींची संख्या कमी झाली असली तरी, सर्वाधिक ३० झाडे पडल्याचा असून १३ फांद्या तुटल्याच्या तक्रारी आहेत. तर पाणी साचल्याचा अवघ्या ८ तक्रारी असून दरड कोसळल्याची एक ही तक्रार नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.