ठाणे जिल्ह्यात होणार दोन लाख मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
By Admin | Updated: September 16, 2015 23:50 IST2015-09-16T23:50:36+5:302015-09-16T23:50:36+5:30
महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे गुरु वारी आगमन होत आहे. या वर्षी ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे दोन लाख गणेशमूर्तींची

ठाणे जिल्ह्यात होणार दोन लाख मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
- पंकज रोडेकर, ठाणे
महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे गुरु वारी आगमन होत आहे. या वर्षी ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे दोन लाख गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
यात शहर पोलीस आयुक्तालयात सुमारे १ लाख ६९ हजार ४७२ तर ग्रामीण भागातील २४ हजार ४३२ बाप्पांचा समावेश आहे.
या वर्षी शहरी भागात घरगुती गणेशाची संख्या ४१ हजार ३८४, सार्वजनिक ४८ ने वाढली आहे. तर, ग्रामीणमध्ये ३१ सार्वजनिक बाप्पांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, गणेशमूर्तींची संख्या वाढली असली तरी न्यायालयीन तिढ्यामध्ये मंडपांचा आकार अडकल्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांचे मंडप अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज झाले असून गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक मंडळांच्या भव्यदिव्य गणेशमूर्ती जल्लोषात आणल्या जात आहेत.
भिवंडीमध्ये १३९ सार्वजनिक गणपती
भिवंडीमध्ये १३९ सार्वजनिक, ९५१० घरगुती, ४४० गौरी; कल्याणमध्ये २९९ सार्वजनिक, ४२ हजार २५० घरगुती, २ हजार ५५० गौरी; उल्हासनगर-अंबरनाथमध्ये ३०८ सार्वजनिक, ४५ हजार ७० घरगुती, ५ हजार ५७५ गौरी आणि वागळे परिमंडळामध्ये २१६ सार्वजनिक, २४ हजार ७५७ घरगुती व एक ५३८ गौरींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गणेशमूर्ती तसेच शहरी भागात यंदा गौरार्इंची संख्या ७६८ ने वाढली आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकाच्या हद्दीत यंदा सार्वजनिक ९६८ आणि घरगुती २३ हजार ४८४ बाप्पांचे आगमन होणार आहे. तसेच तीन हजार १८६ गौराई माहेरी येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
११ हजार ७७६ घरांमध्ये गौरी
- मागील वर्षी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये १ लाख २८ हजार ८८ घरगुती तर १ हजार ५३ सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना झाली होती. तसेच गेल्या वर्षी ११ हजार ८ गौराई माहेरवासाला आल्या होत्या.
- या वर्षी त्यामध्ये वाढ झाली आहे. यंदा ११ हजार ७७६ घरांमध्ये गौरी माहेरवासाला येणार आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील १४४ सार्वजनिक, १६ हजार ७७९ घरगुती आणि १६७३ गौरींचा समावेश आहे.
नऊ हजार पोलिसांसह आठ कंपन्या
सध्याची दहशतवादी पार्श्वभूमी लक्षात घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत ९ हजार पोलीस आणि होमगार्ड यांची फौज तैनात केली आहे. यामध्ये राज्य राखीव दल, सीमा सुरक्षा दल अशा ८ कंपन्या ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यंदा त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक मंडळ कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील (फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप) भावना भडकवणाऱ्या मेसेजला बळी पडू नये, असे मेसेज आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करून असे मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली.