ठाणे जिल्ह्यालादेखील कुपोषणाचा विळखा
By Admin | Updated: November 14, 2016 04:19 IST2016-11-14T04:19:34+5:302016-11-14T04:19:34+5:30
नागरी, सागरी आणि डोंगरी या भूप्रदेशांत विभागलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ लाख १६ हजार २९५ बालके ४ हजार ४५३ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ

ठाणे जिल्ह्यालादेखील कुपोषणाचा विळखा
सुरेश लोखंडे / ठाणे
नागरी, सागरी आणि डोंगरी या भूप्रदेशांत विभागलेल्या ठाणे जिल्ह्यात १५ लाख १६ हजार २९५ बालके ४ हजार ४५३ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बागडत असून त्यात ८ हजार १९२ बालके शाळाबाह्य आहेत. ११ हजार मुले कुपोषण पीडित असून ८९३ बालके तीव्र कुपोषणामुळे जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे उघड झाले आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात मुलांचे चाचा नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ‘बालदिन’ साजरा होत असताना जिल्ह्यातील बालकांची ही अवस्था समोर आली आहे.
जिल्ह्यात ५२ कनिष्ठ महाविद्यालयांसह प्राथमिक व उच्च माध्यमिक, माध्यमिक असलेल्या एकूण १३०७ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांत सोयीसुविधा उत्तम आहेत. मराठी माध्यमाच्या दोन हजार ५२४ शाळांपैकी उच्च माध्यमिक १४ शाळा, प्राथमिक एक हजार १९६, माध्यमिक २८६, प्राथमिकसह माध्यमिक ८३० शाळा जिल्ह्यात आहेत. यातील अनेक शाळांतील मुले सोयीसुविधेपासून वंचितच राहिले आहेत.
पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी १०० गॅ्रम सकस व पोषण आहार देण्यासाठी प्रतिविद्यार्थी तीन रुपये ८६ पैसे, तर सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅमच्या आहारासाठी पाच रुपये ७८ पैसेयाप्रमाणे प्रत्येक दिवसाकरिता शासन अनुदान दिले जात आहे. दोन हजार ७४५ प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पाच लाख २९ हजार १८२ विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जातो. तरीही, बालके कुपोषणाने पीडित असल्याचे वास्तव नजरेआड करता येत नाही.
11,000बालकांना कुपोषणाची पिडा-
ग्रामीण, आदिवासी, दुर्गमभागात एक लाख १८ हजार ६५६ बालके आहेत.
यातील सहा वर्षेवयोगटाचे एक लाख पाच हजार ८५४ बालके सर्वसाधारण श्रेणीचे आहेत. तर, ११ हजार बालके कुपोषणाने पीडित आहेत.
यामध्ये ८९३ बालके तीव्र कुपोषणाने जर्जर झाले आहेत. त्यांना सशक्त करण्यासाठी ‘व्हीसीडीसी’ केंद्राद्वारे सतत पोषण आहार देणे गरजेचे आहे.
वर्षभरात ८१९३ शाळाबाह्य बालकांचा शोध -
‘शिक्षणाचा हक्क’ मिळवून देण्याच्या नावाखाली केवळ सर्वेक्षण करून मुलांच्या संख्यांनी केवळ रकाने भरले जात आहेत. या वर्षभरात आठ हजार १९३ शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
यापैकी महापालिकांकडून दोन हजार ३८८ मुलांना शाळेत दाखल केल्याचे सांगितले जात आहे. तर, जिल्हा परिषदेकडून एक हजार २०४ मुलांना शाळेत घेतल्याचा दावा केला आहे; पण चौकशीअंती बहुतांश ठिकाणी या मुलांची नोंद आढळून येत नाही.
सहा महापालिकांमध्ये सहा हजार ७७५ मुले शाळाबाह्य आहेत. यामध्ये तीन हजार ७२० मुलांसह तीन हजार ५५ मुलींचा समावेश आहे. गावखेड्यांत एक हजार ४१८ बालके शाळाबाह्य आहेत. यात ७०१ मुलींचा समावेश आहे.