ठाण्यात ‘डिजी ठाणे’ प्रकल्प
By Admin | Updated: May 9, 2017 00:59 IST2017-05-09T00:59:26+5:302017-05-09T00:59:26+5:30
शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवनमान उंचावणे, त्यांना सुरक्षितता प्राप्त व्हावी आणि शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये

ठाण्यात ‘डिजी ठाणे’ प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवनमान उंचावणे, त्यांना सुरक्षितता प्राप्त व्हावी आणि शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये धोकेविरहित व्यवसाय करता यावा, या दृष्टिकोनातून ठाणे शहरामध्ये इस्त्रायलमधील तेलअवीव शहराच्या धर्तीवर डिजी ठाणे हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात या प्रकल्पाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत बोलताना दिली.
या प्रकल्पाचे प्रामुख्याने तीन प्रकारचे फायदे ठाणेकर नागरिकांना होणार असून यामध्ये १) शासन ते नागरिक - मध्ये महापालिकेसह इतर विभागांमार्फत उपलब्ध होणाऱ्या सेवा, त्याबाबत सविस्तर माहिती, संबंधित योजनांचे फॉर्मदेखील डाउनलोड करता येणार आहेत. २) व्यवसाय ते नागरिक -मध्ये व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने विविध माहिती नागरिकांना एसएमएसद्वारे पाठवण्यासाठी आवश्यक तो डाटा वापरून त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल. ज्यायोगे व्यवसायवृद्धीस त्याचा फायदा होणार आहे. ३) नागरिक ते नागरिक - शहरातील एका भागातील नागरिकांतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दुसरीकडील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा फायदा होईल.
याप्रसंगी इस्त्रायलमधील तेलअवीव महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जो अॅलन आणि या प्रकल्पाचे इस्त्रायलमधील प्रमुख जोहर शेरॉन यांनीदेखील या प्रकल्पाबाबत महापलिका अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ही योजना नागरिक व महापालिकेसाठी कशी फायदेशीर आहे, याची माहिती दिली. या वेळी ा्रवीण भारद्वाज, राहुल नाईक, अनिकेत सिंग, डीसीएफ अॅडव्हायझरी सर्व्हिसेसचे वैभव सराफ, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, प्रभारी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपआयुक्त (मुख्यालय) संजय निपाणे उपस्थित होते.