ठाणे : तुझ्याशी थोडं खासगी बोलायचं आहे, असे म्हणत एका रुग्णालयातील ३३ वर्षीय परिचारिकेला वॉर्डबॉय हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. एका ४१ वर्षीय वॉर्डबॉयने हे कृत्य केले असून, याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असे ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी सांगितले.
पीडित परिचारिका आणि आरोपी वॉर्डबॉय ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात नोकरीला आहेत. दोघेही एकमेकांचे चांगले परिचित आहेत. त्यामुळे तिचा विश्वास संपादन करून त्याने खासगी बोलायचे असल्याचे सांगत एका हॉटेलवर नेले होते.
दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार
आरोपीने तिला आधी ठाण्यातील हॉटेल मौर्या येथे नेले. हॉटेलमधील एका रूममध्ये गेल्यानंतर गुंगी येणारा पदार्थ मिसळलेले ज्यूस त्याने तिला दिले. नर्स बेशुद्ध पडली तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा बदनामी करण्याची धमकी देऊन तो तिला सिग्नेचर हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथेही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
हा सर्व प्रकार १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर संशयित वॉर्डबॉयविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.