ठाण्यात तांदूळ खरेदीच्या बहाण्याने १३ कोटींचा गंडा
By Admin | Updated: March 27, 2017 04:11 IST2017-03-27T04:11:53+5:302017-03-27T04:11:53+5:30
कोट्यवधीचा रुपयांचा तांदूळ आपल्या साथीदारांकडून खरेदी करण्यास तांदूळ व्यापारी रवींद्रनाथ मुजमदार यांना भाग पाडून

ठाण्यात तांदूळ खरेदीच्या बहाण्याने १३ कोटींचा गंडा
ठाणे : कोट्यवधीचा रुपयांचा तांदूळ आपल्या साथीदारांकडून खरेदी करण्यास तांदूळ व्यापारी रवींद्रनाथ मुजमदार यांना भाग पाडून त्यांची डिलिव्हरी न करताच १३ कोटी ८१ हजार ६४५ रुपयांचा अपहार करणाऱ्या दिनेश दत्ताराम पाटील, रोहित शर्मा आणि मनोज गोसावी या तिघांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दिनेश हे मुलुंडच्या अश्विनी इंटरनॅशनल इपॅक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. ही ओळख लपवून ते मुजूमदार यांच्याकडे ३ फेबु्रवारी २०१७ रोजी कार्यालयीन सहाय्यक म्हणून कामाला लागले. त्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी ठेवू लागले.
त्यानंतर मुजूमदार यांचा विश्वास संपादन करून रोहित शर्मा, मनोज गोसावी या आपल्या साथीदारांची तांदूळ विक्रेते म्हणून मुजूमदार यांना ओळख करून दिली.
आपल्या या साथीदारांकडून कमी किमतीत तांदूळ खरेदी करून देण्यासाठी मध्यस्थीदेखील केली. त्यानुसार मुजूमदार यांनी दिनेशच्या मित्रांना १३ कोटी ८१ हजार ६४५ रुपयांच्या तांदूळाची आॅर्डर दिली.
दिलेल्या आॅर्डरसाठी ठरल्याप्रमाणे त्यांनी सदर रकमेचा चेक अश्विनी इंटरनॅशनल इपॅक्स प्रा. लि. च्या बँक खात्यात जमा केला. हा चेक वळता करण्यात आला. मात्र, पैसे दिल्यानंतर एक महिना उलटूनही तांदूळ किंवा पैसे परत न मिळाल्याचा मुजूमदार यांचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांनी २५ मार्च रोजी दिनेश पाटीलसह त्याच्या साथीदारांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)