ठाण्यात सोनसाखळी चोरांचे आव्हान कायम

By Admin | Updated: October 3, 2015 02:24 IST2015-10-03T02:24:11+5:302015-10-03T02:24:11+5:30

शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण,उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांत सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीचे सत्र सुरूच आहे.

In Thane, ChanSakal thieves have a challenge | ठाण्यात सोनसाखळी चोरांचे आव्हान कायम

ठाण्यात सोनसाखळी चोरांचे आव्हान कायम

जितेंद्र कालेकर, ठाणे
शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण,उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांत सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठ महिन्यांत ७०४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गर्दीची ठिकाणे, ओसाड जागांना इराणी वस्तीतील सोनसाखळी चोरांनी लक्ष्य केले आहे. इराणी वस्तीवर कोम्बिंग आॅपरेशनसह गस्तीचे प्रमाण वाढवून बाहेरील जिल्ह्यांत आणि राज्यातूनही मंगळसूत्र चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यानंतर, काहीअंशी या गुन्ह्यांमध्ये फरक पडला असला तरी अजूनही त्यांचे आव्हान कायम आहे. त्यामुळे लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या मोहिमेद्वारे पोलिसांप्रमाणेच नागरिकांनीही हे गुन्हे रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ठाणे शहरातील शिवाईनगर, नीळकंठ हाईट्स, घोडबंदर रोड, नौपाडा, गोखले रोड, वर्तकनगर आणि उपवन या परिसरांत सकाळी मॉर्निंग वॉक, शाळेत मुलांना सोडविण्यासाठी आणि खरेदीसाठी जाणाऱ्या-येणाऱ्या गृहिणी तसेच वृद्ध महिलांना टार्गेट केले जाते. या वाढत्या प्रकारांमुळे सोनसाखळी चोरट्यांवर मोक्कांतर्गतही कारवाई करण्यात आली. तरीही, प्रकार सुरूच राहिल्यामुळे गर्दी आणि मोक्याच्या ठिकाणी गृहरक्षक दल आणि पोलिसांची गस्त वाढविण्यात आली. एखादी महिला पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या दोघांपैकी मागे बसलेला हल्लेखोर सोनसाखळी हिसकावून क्षणार्धात गायब होतो. ठाणे जिल्हा रुग्णालयाजवळ २७ जून २०१५ रोजी नंदा दिलीप शेटे (४९) या महिलेने मोठ्या धाडसाने चोराला पकडले. हेच धाडस इतरांनीही दाखविण्याची गरज असल्याचा सल्ला शेटे यांनी इतर महिलांना दिला.
कल्याणच्या आंबिवली भागातील इराणीच मुख्यत्वे सोनसाखळीच्या जबरी चोरीचे प्रकार करीत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. पाच महिन्यांपूर्वी ठाण्याचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील आणि गुन्हे अन्वेषण विभागाने ३५० पोलिसांची फौज घेऊन जग्गू इलासी याच्यासह आठ जणांची आंबिवलीतून धरपकड केली. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. त्या वेळी एक किलो सोन्याचे दागिने जप्त केले होते.
इराणींचे पोलिसांना आव्हान
अंगाने मजबूत असलेले इराणी चोरटे सकाळी उठल्यापासून सावज हेरतात. त्यांच्यापैकी १५ ते १८ वयोगटांतील मुले मोटारसायकली चोरतात. १८ ते २५ वयोगट सोनसाखळी चोरण्याचा ‘उद्योग’ करतात. तर, २५ ते ३५ वयोगटांतील भामटे हे बतावणी करून फसवणुकीचे प्रकार करतात. घराबाहेरच जेवण करून पोलिसांना ते नेहमीच हुलकावणी देत असतात. काही प्रकारांत त्यांच्या घरच्या महिलाही त्यांना साथ देतात.
पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांनीही सोनसाखळी चोरांना लक्ष्य करून टॉप २० आणि टॉप ५० या सोनसाखळी चोरट्यांची यादी बनविली. त्यानुसार, आंबिवलीच्या इराणी वस्तीत कोम्बिंग आॅपरेशनही केले होते.
ठाणे शहर परिसरात घडलेल्या एखाद्या गुन्ह्याचा छडा थेट बाहेरील जिल्ह्यांतून आणि राज्याबाहेर जाऊन लावण्यात आल्याचे ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सोलापुरातून तीन साखळीचोरांना पकडण्यात आले.
तर, गुन्हे अन्वेषण विभागात प्रत्येक झोनवाइज सहा विशेष पथके तयार केल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने थेट उत्तर प्रदेशातून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनही मोठा ऐवज हस्तगत केला. ठाणे शहर आणि परिसरात महत्त्वाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी मोटारसायकल आणि साध्या वेशातील पोलीस गस्त घालून सोनसाखळी चोरांना रंगेहाथ पकडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: In Thane, ChanSakal thieves have a challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.