मुंबई - मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे - बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पासाठी बोरिवली बाजूकडील उर्वरित ३,६५८ चौ. मी. जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एमएमआरडीएकडे हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडथळे दूर झाले असून, प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे - बोरिवलीदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ११.८५ किलोमीटर लांबीच्या मार्गाची उभारणी एमएमआरडीएकडून केली जात आहे. यात १०.२५ किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी १८,८३८ कोटी रुपये खर्च येणार आहे.
शाफ्ट उभारणीचे काम सुरूएमएमआरडीएने मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला जून २०२३मध्ये प्रकल्पाचे काम दिले आहे. आता प्रकल्पाचे ठाणे बाजूकडील काम सुरू झाले आहे. कंत्राटदाराने भुयारीकरणासाठी टीबीएम मशिन बोगद्यात उतरविण्यासाठी शाफ्ट उभारणीचे काम सुरू केले आहे. मात्र, या प्रकल्पाची बोरिवली बाजूकडील भुयारीकरणापूर्वीची प्राथमिक कामेही सुरू झालेली नाहीत. त्यामध्ये भूसंपादनाचा अडथळा होता. मात्र, आता एसआरएने प्रकल्पासाठी आवश्यक सर्व जमीन एमएमआरडीएकडे हस्तांतरीत केली आहे.
३४३ रहिवाशांसाठी संक्रमण गाळेएसआरएने गेल्या महिन्यात या प्रकल्पात बाधित होणाऱ्या ३४३ रहिवाशांसाठी संक्रमण गाळे एमएमआरडीएला दिले आहेत. आता उर्वरित ३,६५८ चौ. मी. जागाही दिली आहे. मात्र, कागदोपत्री जागा हस्तांतरीत झाली असली एमएमआरडीएला रहिवाशांचे स्थलांतरण करून झोपड्या काढाव्या लागणार आहेत. त्यासाठी आणखी काही काळ जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल.