- अजित मांडके ठाणे - देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील काही भागात आठवड्यातून १५ दिवसातून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाणी कपात केली जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू करण्यात आली असल्याने त्याचा फटका देखील ठाण्यातील बहसुंख्य भागांना बसणार आहे. त्यामुळे ज्या भागांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे. त्याठिकाणी पाणी पुरवठ्याचे नियोजन ठाणे महापालिकेने केले आहे. त्यानुसार ज्या भागांना दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. त्याभागांना आता पुढील काही दिवस दिवसातून एकदा दोन तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन ठाणे महापालिकेने आखले आहे.
मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठयाच्या पिसे येथील पाणी उद्चंन केंद्रामध्ये अचानक आग लागल्याने मुंबईतील अनेक भागांचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यानुसार सोमवारी रात्रीपासूनच मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार त्याचा फटका आता ठाणे शहरातील बहुसंख्य भागांना बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला रोज ८५ दशलक्ष लीटर एवढा पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेने ठाण्यात देखील ५० टक्के पाणी कपात लागू केली आहे. जो पर्यंत काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत ही कपात लागू असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या पाणी कपातीचा सामना आता शहरातील धोबी घाट कोपरी पूर्व, आनंद नगर गांधी नगर, नौपाडा, बी कॅबीन, राम मारुती रोड टेकडी बंगला, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, वागळे इस्टेट, साईनाथ नगर, रघुनाथ नगर, अंबिका नगर, जिजामाता नगर, रामंचद्र नगर, इंदिरा नगर आदी भागांना याचा फटका बसणार आहे.
येथील बहुसंख्य भागांना दिवसातून दोन किंवा तीन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु येथील रहिवाशांना पाणी कपातीचा अधिकचा फटका बसू नये यासाठी महापालिकेने उपाय योजना आखल्या आहेत. त्यानुसार येथील भागांना आता दिवसातून एकदाच दोन तास पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार गावदेवी येथील पाण्याची टाकी भरल्यानंतर येथील भागांना पाणी पुरवठा आणि टेकडी बंगला येथील पाण्याची टाकी भरल्यानंतर तेथील भागांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.