ठाणे, भिवंडीला भातसाचा हात

By Admin | Updated: December 29, 2016 02:56 IST2016-12-29T02:56:55+5:302016-12-29T02:56:55+5:30

भातसा धरणातून मुंबईला पाणी दिल्यानंतर उरलेल्या पाण्यातून ठाणे, भिवंडी आणि कल्याण तालुक्याला जादा पाणी देण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.

Thane, Bhiwandi to Bhattas hand | ठाणे, भिवंडीला भातसाचा हात

ठाणे, भिवंडीला भातसाचा हात

ठाणे : भातसा धरणातून मुंबईला पाणी दिल्यानंतर उरलेल्या पाण्यातून ठाणे, भिवंडी आणि कल्याण तालुक्याला जादा पाणी देण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. ठाण्यात पुढील महिन्यात, तर भिवंडीत सहा महिन्यांनी होणाऱ्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वाढीव पाणीसाठ्याचा दिलासा मिळणार आहे.
शहापूर तालुक्यातील ज्या गावांना सध्या भातसातून पाणी पुरवले जाते, त्यांचा कोटा वाढवावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले. शहापूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मुमरी धरणाच्या कामाला गती देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, तर भावली धरणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावल्याचे आमदार किसन कथोरे यांनी निदर्शनास आणले.
भातसा हा शहापूर तालुक्यातील मोठा प्रकल्प असून शहापूरला उन्हाळ््यात तीव्र पाणीटंचाई सोसावी लागते. त्यामुळे शहापूरला पाणी देण्यासाठी काही लघु प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. भातसा प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शिंदे यांच्यासमवेत आमदार शांताराम मोरे, रवींद्र फाटक, किसन कथोरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अधीक्षक अभियंता लोहार उपस्थित होते. ठाणे आणि भिवंडीला भातसातून किती जादा पाणी देता येईल, त्याचे नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी सुचवले. भातसापासून सहा किमी अंतरावर मुमरी धरण बांधल्यास त्यातून अतिरिक्त ७२.५० दलघमी पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली.
शहापूरच्या पाणीप्रश्नात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने गुरूत्त्वाकर्षणावर आधारित भावली धरण मार्गी लागेल, असा विश्वास आमदार किसान कथोरे यांनी व्यक्त केला. प्रत्येक महापालिका, नगरपालिका आदी यंत्रणा नेमके किती पाणी उचलतात, त्यांना पाण्याचा किती उपयोग होतो, याची माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे मंडळाला दिले. (प्रतिनिधी)

मुमरी धरणाला शेतकरी, आदिवासींचा विरोध कायम
भातसा धरणापासून साधारण दोन किमी अंतरावर मुमरी नदीवर धरण बांधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आधीच्याच धरण प्रकल्पग्रस्तांचे पुर्वसन झालेले नाही, हे दाखवून देत मुमरी घरणाविरोधातही संघर्ष समिती स्थापन झाली आहे. या धरणाखाली ५७३ हेक्टर जमीन बुडेल, तर ५४ कुटुंबे विस्थापित होतील, असा समितीचा दावा आहे.
सारंगपुरी, खरा, रूमाल, अवकळवाडी, कोठारा गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय दुर्मिळ वनस्पतीही पाण्याखाली गेल्याने-वनसंपदेचा ऱ्हास होणार असल्याने आदिवासींची उपजीविका हिरावली जाईल, असा त्यांचा दावा आहे.
भूकंपप्रवण क्षेत्रामुळे ब्रिटिशांच्या काळात या धरणाचा प्रस्ताव बारगळला होता. या धरणाची लांबी १२४० मीटर इतकी असून उंची ४६ मीटर असेल. त्यातून शेती, पिण्यासाठी पाणी देण्याची योजना असली, तरी या भागातील प्रकल्पांमुळे शेती नष्ट होत असल्याने पिण्यासाठीच या धरणातील पाण्याचा सर्वाधिक वापर होण्याची शक्यता आहे.

भावली धरणाच्या श्रेयाचा वाद
इगतपुरीजवळील भावली धरणातून शहापूरला पाणी देण्याचा मुद्दा गेले वर्षभर गाजतो आहे. त्या धरणासाठी राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांना पाठपुरावा केला. त्यासाठी उपोषणाचा इशारा दिला. सभागृहात विषय मांडला. मुख्यमंत्र्यांकडे त्याचे सादरीकरण केले. आता भाजपाच्या नेत्यांनीही हा विषय हाती घेतला असून मुख्यमंत्री हा प्रकल्प मार्गी लावत असल्याने त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Web Title: Thane, Bhiwandi to Bhattas hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.