ठाण्यात 39 हजार 808 रुग्णांनी एका महिन्यात केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 23:54 IST2021-05-01T23:54:23+5:302021-05-01T23:54:30+5:30
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर : एप्रिलमध्ये आढळले होते ४१ हजार २५ रुग्ण

ठाण्यात 39 हजार 808 रुग्णांनी एका महिन्यात केली कोरोनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन, पालिकेने सुरू केलेल्या विविध उपाययोजना आणि आतापर्यंत झालेले लसीकरण यामुळे ठाण्यात एप्रिल महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी करण्यात त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. ठाणेकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागेल. एप्रिल महिन्यात ठाण्यात कोरोनाचे नवे ४१ हजार २५ रुग्ण आढळले असले, तरी याच कालावधीत तब्बल ३९ हजार ८०८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र, दुर्दैवाने १६३ जणांचा मृत्यू झाला.
ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख १८ हजार ९२१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील १ लाख ७ हजार २४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १० हजार ७० एवढी आहे. यातील ७ हजार १४१ म्हणजे ८० टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. विविध रुग्णालयांत २ हजार ५७७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी १७१ व्हेंटिलेटरवर, ४८३ रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. एप्रिल महिन्यात ठाण्यात १६३ रुग्णांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या माध्यमातून वर्षभरात १५ लाख २६ हजार ४०७ नागरिकांची कोरोना चाचणी केली. आजही दिवसाला पाच हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत.
nठाण्यात सुमारे १५ दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्क्यांच्या आसपास होते. तेच आता, ९० टक्क्यांच्या आसपास आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
nएकाला बाधा झाली तर त्याच्या संपर्कातील ३७ जणांना विलगीकरणात ठेवले जात आहे. लॉकडाऊनमुळेदेखील आता रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी शहरात ६८८ नवे रुग्ण आढळले असून १२८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
nजानेवारी महिन्यापासून ठाण्यात लसीकरण मोहीम सुरू झाली. लसी योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्या तर शहरातील ५६ केंद्रे सुरू असतात. आतापर्यंत ३ लाख २ हजार ६३७ जणांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले.