ठाण्यातील अंबरनाथ परिसरात मंगळवारी धक्क्कादायक घटना घडली. रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका १७ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
विघ्नेश कचरे (वय, १७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो अंबरनाथ पश्चिमेकडील भेंडी पाडा परिसरात वास्तव्यास होता. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास विघ्नेश आपल्या दोन मित्रांसह घरी जात असताना लघुशंका करण्यासाठी रस्त्यात पार्क केलेल्या ट्रकच्या मागे गेला, जिथे तो जिवंत तारेच्या संपर्कात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अंबरनाथ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'संबंधित मुलगा विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ दवाखान्यात पाठवले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली. परंतु, या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल', असेही ते म्हणाले.