ठाकुरांची ‘मन की बात’ कोण जाणे?

By Admin | Updated: May 24, 2016 02:16 IST2016-05-24T02:16:33+5:302016-05-24T02:16:33+5:30

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत ११९ मते खिशात असलेले बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसचे

Thakur's mind 'talk about' who? | ठाकुरांची ‘मन की बात’ कोण जाणे?

ठाकुरांची ‘मन की बात’ कोण जाणे?

ठाणे : ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत ११९ मते खिशात असलेले बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांना की शिवसेनेचे रवींद्र फाटक यांना, ही बाब गुलदस्त्यात असून जो ही मते एकगठ्ठा आपल्याकडे वळवेल, त्याचे पारडे जड राहणार आहे. ठाकूर यांचे शरद पवार व वसंत डावखरे यांच्याशी जुने संबंध आहेत, तर राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी आहे. त्यामुळे जुने नातेसंबंध की सत्ताधारी, असे पर्याय ठाकूर यांच्यासमोर आहेत.
हितेंद्र ठाकूर यांची काही दिवसांपूर्वी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व उमेदवार वसंत डावखरे यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर, ठाकूर यांचा पाठिंबा डावखरे यांना असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले. अगदी अलीकडे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, उमेदवार रवींद्र फाटक व मिलिंद नार्वेकर यांनी ठाकूर यांची भेट घेतली. राऊत यांचे ठाकूर यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध असून नार्वेकर हे वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांच्या सातत्याने संपर्कात असतात. त्यामुळे आता ठाकूर यांची ‘मन की बात’ डावखरे यांना की फाटक यांना लवकर समजते, त्यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत शिवसेनेने रवींद्र फाटक यांना उमेदवारी देऊन उडी ठोकल्याने राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही उमेदवारांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. ठाकूर यांच्या भेटीनंतर शिवसेना ‘आम्ही बोलून दाखवणार नाहीतर करून दाखवणार’ अशी गर्जना करीत असून आम्ही दुप्पट मतांनी विजय साजरा करू, असा दावा करीत आहे. शिवसेनेकडे राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक मते असली तरीदेखील अपक्ष आणि बविआची मते निर्णायक ठरणार आहेत. शिवाय, कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या नगरसेवकांची मते कुणाच्या पारड्यात पडणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
छोटे पक्ष व अपक्ष यांच्या मतांची बेरीज ११९ आहे व तेवढीच मते बविआकडे आहेत. परंतु, छोटे पक्ष व अपक्षांची मते वळवण्यात बरीच डोकेदुखी असते. त्यापेक्षा ठाकूर यांच्याकडील एकगठ्ठा मतांची हमी मिळाली, तर काही मोजकीच छोट्या व अपक्षांची मते मिळवली तरी विजय सुकर होतो. त्यामुळे दोघांचीही ठाकुरांना पटवणे सुरू आहे.
ठाकूर यांची केवळ सदिच्छा भेट घेतल्याचा दावा शिवसेना करीत आहे, तर बविआचा पाठिंबा हा राष्ट्रवादीचे डावखरे यांनाच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. मात्र, ठाकुरांच्या भेटीगाठीकरिता दोघांंचीही लगबग औत्सुक्य वाढवणारी आहे. ठाकूर आता एकगठ्ठा प्रेम दाखवतात की, राष्ट्रवादीच्या जुन्या मैत्रीला जागतानाच सत्ताधाऱ्यांची खप्पामर्जी होणार नाही, याची काळजी घेतात, याचे कुतूहल चर्चेत आहे. एकंदरीत ठाकूर फॅक्टर चर्चेत राहणार आहे. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीकडे १९९, काँग्रेसकडे १०३ आणि बहुजन विकास आघाडीकडे ११९ असे ४२१ मतांचे बळ डावखरेंकडे आहे. तर, शिवसेना ३११, भाजपा १८० अशी ४९१ मते युतीकडे आहे. उर्वरित मतांमध्ये रिपाइंचे ८, अपक्ष ४८, मनसे २०, बसपा ५, सपा १७, एमएमआय १, कोविआ ७, सेक्युलर अलायन्स आॅफ इंडिया ४ आणि डाव्यांची ५ मते आहेत. ही संख्या ११९ च्या घरात जात असून ही आणि बहुजन विकास आघाडीची ११९ मते निर्णायक आहेत.

Web Title: Thakur's mind 'talk about' who?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.