ठाकरे गटाचे नेते मनोहर मढवी यांना अडीच लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक
By अजित मांडके | Updated: April 27, 2024 21:50 IST2024-04-27T21:49:36+5:302024-04-27T21:50:30+5:30
ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाची कारवाई: कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा.

ठाकरे गटाचे नेते मनोहर मढवी यांना अडीच लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमदेवार राजन विचारे यांचे समर्थक आणि नवी मुंबईमधील उद्धव सेनेचे नेते माजी नगरसेवक मनोहर मढवी उर्फ एमके यांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी अडीच लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक केली. कळव्यातील एका केबल व्यावसायिकांकडून ही खंडणी घेताना पोलिसांनी मढवी यांना रंगेहात पकडले.
कळव्यातील एका केबल व्यवसायिकाकडे मढवी यांनी अडीच लाखांची खंडणी मागितली होती. त्यापैकी दीड लाख रुपये त्यांनी शुक्रवारी घेतले होते तर, एक लाख रुपये शनिवारी देण्यास सांगितले होते. याबाबत केबल व्यावसायिकाने ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार केली होती. दरम्यान मढवी यांनी केबल व्यावसायिकाला एक लाख रूपये घेऊन ऐरोली येथील कार्यालयात बोलावले होते. तिथे ठाणे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मढवी यांना एक लाखांची खंडणी घेताना रंगेहात पकडले, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष कृती दलाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी दिली.