ठाण्यात बोटाला शाई लागलीच नाही
By Admin | Updated: November 17, 2016 06:48 IST2016-11-17T06:48:14+5:302016-11-17T06:48:14+5:30
नोटबंदीनंतर एकाच दिवसात वारंवार पैसे बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर अंकुश बसावा, म्हणून शासनाने बोटाला शाई लावण्याचा निर्णय

ठाण्यात बोटाला शाई लागलीच नाही
ठाणे : नोटबंदीनंतर एकाच दिवसात वारंवार पैसे बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर अंकुश बसावा, म्हणून शासनाने बोटाला शाई लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात बुधवारपासून झाली आहे. परंतु ठाण्यात मात्र बोटाला शाई लागलीच नसल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात अद्याप कोणतेही निर्देश येथील बँकांना प्राप्त झाले नसून शाई कोण देणार, असा सवालही बँकांनी केला आहे.
रद्द झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला मतदानाच्या वेळी लावतात तशी शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने रोजंदारीवर लोकांना कामाला ठेवून ४५०० रुपये याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नोटा बदलून घेण्याची काळ्या पैसेवाल्यांनी शोधलेली पळवाट बंद करणे, बँकांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी करणे, असा यामागचा शासनाचा हेतू आहे. त्यानुसार, याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. परंतु, ठाण्यात मात्र त्यानुसार कार्यवाही होताना दिसून आली नाही. नागरिक नेहमीप्रमाणे बँकांमध्ये रांगेत उभे राहून नोटा बदलून घेत होते.
दरम्यान, यासंदर्भात ठाण्यातील काही बँक व्यवस्थापकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, याबाबत अद्याप कोणतेही निर्देश बँकेला प्राप्त झालेले नाहीत. तसेच ही शाई उपलब्ध कोण करून देणार, असा सवालही त्यांनी केला आहे. रोज शेकडो नागरिक रांगेत उभे असतात. त्यामुळे त्यांच्या बोटाला लागणारी शाई उपलब्ध कशी करून द्यायची आणि त्यासाठी पुन्हा लागणारा कर्मचारीवर्ग आणायचा कुठून, असे अनेक प्रश्न बँकांना पडले. यामुळे ठाण्यात पहिल्या दिवशी बोटाला शाई लागली नाही. (प्रतिनिधी)