अंबरनाथ, बदलापूरमधील चाचणी अहवाल रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST2021-04-03T04:37:20+5:302021-04-03T04:37:20+5:30

उल्हासनगरच्या लॅबमध्ये नमुने पाठवण्याची वेळ लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरमधील कोरोना चाचणीचे नमुने तपासणाऱ्या लॅबमध्ये तांत्रिक ...

Test report stalled at Ambernath, Badlapur | अंबरनाथ, बदलापूरमधील चाचणी अहवाल रखडले

अंबरनाथ, बदलापूरमधील चाचणी अहवाल रखडले

उल्हासनगरच्या लॅबमध्ये नमुने पाठवण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरमधील कोरोना चाचणीचे नमुने तपासणाऱ्या लॅबमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांतील कोविड चाचणीचे अहवाल गेल्या दोन दिवसांपासून रखडले आहेत.

बदलापूरला सरकारच्या वतीने कोविड चाचणी लॅब सुरू करण्यात आली होती. एक एनजीओ ही लॅब चालवत असून, त्यात अंबरनाथ आणि बदलापूरमधील आरटीपीसीआर चाचण्यांचे नमुने तपासले जात आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या लॅबमधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधील कोरोना चाचणीचे अहवाल रखडले आहेत. बदलापूरमध्ये दिवसाला २०० ते २५० आणि अंबरनाथमध्ये दिवसाला जवळपास ४०० संशयितांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, या चाचण्यांचे नमुने तपासलेच जाऊ शकत नसल्याने सगळे निकाल प्रलंबित आहेत. अंबरनाथमध्ये सध्या एक हजार २१३ निकाल येणे बाकी आहे, तर बदलापूरमध्ये सध्या २५० चाचण्यांचे निकाल यायचे आहेत. बदलापूरची लॅब बंद असल्याने हे नमुने सध्या पडघा, ठाणे, उल्हासनगर येथील सरकारी लॅबमध्ये तसेच कल्याणच्या एका खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. मात्र, खासगी लॅबमध्ये एका चाचणीला ५०० रुपये शुल्क भरावे लागणार असून, हा भुर्दंड पालिकेला सोसावा लागणार आहे.

टेस्टिंग लॅबच्या यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे तीन ते चार दिवस रिपोर्ट येणार नाहीत. मात्र, पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

- डॉ. राजेश अंकुश, वैद्यकीय अधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका

लॅब बंद झाली असली तरी चाचणी पडघा आणि ठाणे येथे पाठवून त्याचे लागलीच अहवाल घेतले जात आहेत. अहवाल येण्यास थोडा विलंब होईल; परंतु काम थांबलेले नाही.

-डॉ. धीरज चव्हाण, अतिरिक्त मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका

Web Title: Test report stalled at Ambernath, Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.