टेंडर रिंगमुळेच निकोप स्पर्धा नाही
By Admin | Updated: April 24, 2017 23:54 IST2017-04-24T23:54:32+5:302017-04-24T23:54:32+5:30
केडीएमसी हद्दीतील २७ गावांमध्ये जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी तीनदा निविदा मागवूनही प्रतिसाद मिळालेला नाही.

टेंडर रिंगमुळेच निकोप स्पर्धा नाही
कल्याण : केडीएमसी हद्दीतील २७ गावांमध्ये जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी तीनदा निविदा मागवूनही प्रतिसाद मिळालेला नाही. टेंडरमध्ये होणाऱ्या रिंगमुळेच निकोप स्पर्धा होत नाही, असा आरोप स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
केडीएमसीच्या शुक्रवारी झालेल्या स्थायीच्या सभेत लेखा विभागातील रवी काळे व ई-टेंडरिंग विभागातील राजेश केंबूलकर हे ई-टेंडरिंग प्रक्रियेत होत असलेल्या भ्रष्टाचारात सामील असल्याने त्यांची तेथून बदली करावी, असे आदेश प्रशासनास म्हात्रे यांनी दिले होते.
सभा संपताच शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी आयुक्तांना पत्र देऊन २७ गावांतील जलवाहिनी टाकण्याच्या निविदाधारक रचना कंपनीने त्यांची कागदपत्रे सादर केलेली नसताना त्यांना निविदा मंजूर कशी केली, त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली. या मागणीनंतर म्हात्रे यांनी प्रशासनाने काढलेल्या विविध विकासकामांच्या निविदांना प्रतिसाद का मिळत नाही. त्याला कारण टेंडर प्रक्रियेतील रिंग हे आहे. टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळेच त्याला प्रतिसाद मिळत नाही.
काही मंडळी त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे देण्यासाठी योग्य कंत्राटदारावर दबाव आणतात. त्यामुळे चांगले कंत्राटदार विकासकामांसाठी पुढाकार घेत नाहीत. त्याचे कारण टेंडर प्रक्रियेत निकोप स्पर्धा होत नाही. (प्रतिनिधी)