ग्रामीण भागात बंगले, फार्म हाऊस खरेदीकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST2021-09-02T05:27:50+5:302021-09-02T05:27:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : एखादी व्यक्ती स्थिरावली की, ती ग्रामीण भागातील निसर्गरम्य ठिकाणी बंगलेवजा घरे आणि फार्म हाऊस ...

ग्रामीण भागात बंगले, फार्म हाऊस खरेदीकडे कल
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : एखादी व्यक्ती स्थिरावली की, ती ग्रामीण भागातील निसर्गरम्य ठिकाणी बंगलेवजा घरे आणि फार्म हाऊस तयार करण्यासाठी एनए प्लॉट खरेदीला पसंती देते. त्याचबरोबर अशा प्रकारचे एनए प्लॉट विकसित करण्यासाठी बिल्डर जास्त उत्सुक असतात. कारण ग्रामीण भागातील गृहप्रकल्प विकसित करणे हे छोट्या बिल्डरांच्या बजेटमध्ये असते. बड्या बिल्डरांना ते चुटकीसरशीचे काम वाटते. कारण शहरात जागांची किंमत बिल्डरला परवडणारी नसते. त्यामुळे शहरातील घरे ही ३५ ते ६५ लाख रुपयांच्या रेंजमध्ये मिळतात. ती घेण्याऐवजी ग्रामीण भागात एनए प्लॉट विकत घेऊन आपल्या मर्जीतील वास्तुरचनेप्रमाणे घर बांधता येते. आता शासनाच्या तुकडा बंंदीमुळे अशा भूखंडांची मागणी वाढून त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
सध्या कोरोना काळ असला तरी, जागा खरेदी-विक्रीला फारसा प्रतिसाद नाही. मात्र, अनलॉकमध्ये दुसऱ्या लाटेनंतर जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार पुन्हा खुले केले आहेत. कल्याण-डोंबिवली शहरी भागात एनए प्लॉट विकसित करण्याकडे कल नसला तरी, ग्रामीण भागात एनए प्लॉट विकसित करण्यात जोर आहे. कल्याण-मुरबाड रोड, कल्याण-खडवली रोड, कल्याण-टिटवाळा रोडलगत आणि जंगल भागात एनए प्लॉट आणि फार्म हाऊससाठी जागा खरेदी केल्या जात आहेत.
---------------------------------
काय आहे नवा निर्णय?
जमीन खरेदी-विक्रीमध्ये होणारे तंटे आणि वादविवाद निर्माण होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत. जमीन खरेदी-विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असणार आहे. जमीन दोन एकरापेक्षा कमी क्षेत्र असल्यास खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागणार आहे.
---------------------------------
काय होणार परिणाम?
नव्या नियमानुसार तुकडे पद्धतीने एनए प्लॉटची खरेदी-विक्री केली जाणार आहे. सक्षम अधिकाऱ्याकडे शहानिशा केली जाईल. तसेच जमिनी विकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून फसवणुकीची शक्यता जास्त आहे. विशेषत: काही लोक सेकंड होम म्हणून जास्तीत जास्त बंगलेवजा घर आणि छोटेखानी फार्म हाऊस बांधण्यासाठी प्लॉट घेतात.
---------------------------------
पूर्वीप्रमाणे परवानगी नको
अनेकदा जमीन मालक एनए प्लॉट आहे, असे सांगून जागा विकतात. प्रत्यक्षात जो प्लॉट विकला जात आहे, त्याचा सर्व्हे नंबर काय आहे, तो कोणाच्या मालकीचा आहे, याची माहिती जागा विकताना खरेदी करणाऱ्यास मिळत नाही. सक्षम अधिकाऱ्याची परवानगी बंधनकारक केल्याने नागरिकांची प्लॉट खरेदी करताना होणारी फसवणूक होणार नाही. तसेच खरेदीखत करताना प्लॉट खरेदीदाराला त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे आताचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. पूर्वीप्रमाणे परवानगी नको. बेफाम जागा विक्रीला लगाम लागण्यास मदत होणार आहे.
- रवी पाटील, बिल्डर, कल्याण
---------------------------------
मोठ्या जागेसाठी कुठून पैसा आणणार?
१. माझे वडील निवृत्त झाले. आमचे एक घर शहरात आहे. मात्र, कल्याण ग्रामीण भागात मुरबाड रोडला एनए प्लॉट घ्यायचा होता. नव्या नियमानुसार पैसा कुठून आाणायचा, असा प्रश्न आहे.
- सूरज भोईर
२. मला जास्तीच्या आकाराचा प्लॉट स्वतंत्र घरासाठी टिटवाळा ग्रामीण भागात हवा होता. तो आता घेणे शक्य नाही. नव्या नियमाचा त्याला फटका बसला आहे.
- गजानन शिंत्रे
---------------------------------