न्यायालयात साक्षीदारास अश्रू अनावर
By Admin | Updated: March 23, 2017 01:27 IST2017-03-23T01:27:41+5:302017-03-23T01:27:41+5:30
तब्बल ७४ जणांचा बळी घेणाऱ्या शीळ-डायघर येथील इमारत दुर्घटनेची ठाणे न्यायालयात सुनावणीसुरू झाली असून याप्रकरणातील

न्यायालयात साक्षीदारास अश्रू अनावर
ठाणे : तब्बल ७४ जणांचा बळी घेणाऱ्या शीळ-डायघर येथील इमारत दुर्घटनेची ठाणे न्यायालयात सुनावणीसुरू झाली असून याप्रकरणातील आरोपी धनदांडगे असल्याने आपल्या जीवास धोका असल्याची भीती व्यक्त करताना तक्रारदारास न्यायालयातच रडू कोसळले. या प्रकरणाची संवेदनशील पार्श्वभूमी विचारात घेऊन तक्रारदारास पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी यावेळी केली.
शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली होती. तब्बल ७४ जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेप्रकरणी विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसह २७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या इमारतीच्या तळमजल्यावर शरीफउद्दीन अन्सारी यांचे कपड्याचे दुकान होते. या दुर्घटनेत तेदेखील जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. हा जबाबच तक्रार म्हणून ग्राह्य धरून गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या बहुप्रतीक्षित प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एन. करमरकर यांच्या न्यायालयात बुधवारी सुरू झाली. यावेळी न्यायालयाने शरीफउद्दीन अन्सारी यांची साक्ष तपासली. शरीफउद्दीन हे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले होते. इमारतीचे बांधकाम अतिशय घिसाडघाईने करण्यात आले होते. अवघ्या ३-४ महिन्यांत संपूर्ण इमारत उभारण्यात आली होती, असे सांगून शरीफउद्दीन यांनी या प्रकरणातील पाच आरोपींची ओळख न्यायालयासमोर पटवली. याप्रकरणातील आरोपी धनदांडगे आहेत. त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगताना शरीफउद्दीन यांना भावना अनावर झाल्या. त्यांना न्यायालयातच रडू कोसळले. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी त्यांना धीर दिला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शरीफउद्दीन यांना पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी अॅड. हिरे यांनी न्यायालयास केली. आरोपींची बाजू अॅड. बाबा शेख हे मांडत असून त्यांनी साक्षीदाराची उलटतपासणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)