दी एज्युकेशनच्या निवडणुकीत संघाचा झेंडा
By Admin | Updated: March 1, 2016 02:26 IST2016-03-01T02:26:38+5:302016-03-01T02:26:38+5:30
अंबरनाथमधील दी एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. माजी अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती.

दी एज्युकेशनच्या निवडणुकीत संघाचा झेंडा
अंबरनाथ : अंबरनाथमधील दी एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. माजी अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत अजित म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संघाच्या पॅनलला आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे ही निवडणूक संघासाठी प्रतिष्ठेची झाली होती. अखेर, संघाने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत ६०२ मतदारांपैकी अवघ्या २३१ मतदारांनी सहभाग घेतला.
दी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना १९३६ साली भाऊसाहेब परांजपे यांनी केली. संस्थेच्या कानसई माध्यमिक शाळा, पी.डी. कारखानीस महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय व ज्यु. कॉलेज, बाल भवन प्राथमिक शाळा, सुशीलाताई दामले विद्यालय, शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय, गुरुकुल विद्यालय, डालारे येथे आदिवासी शाळा, आंदाड येथे आदिवासी माध्यमिक विद्यालय याच सोसायटीच्या अंतर्गत आहे.
अध्यक्षपदासाठी संघाच्या वतीने डॉ. श्रीकृष्ण पाडगावकर यांचा अर्ज आला, तर संस्थेच्या गैरकारभाराच्या विरोधात भूमिका घेणारे अजित म्हात्रे यांनीदेखील या पदासाठी अर्ज दाखल केला. मात्र, संघाने चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांनी आपला अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतल्यावर पाडगावकर हे अध्यक्षपदी बिनविरोध आले. मात्र, म्हात्रे यांच्या इतर सदस्यांना कार्यकारिणीत आणि विश्वस्त म्हणून घेण्याचा शब्द न पाळल्याने विश्वस्तपदासाठीचा आपला अर्ज म्हात्रे यांनी कायम ठेवला. त्यांच्यासोबत या पदासाठी मनोज वैद्य आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी मोहनलाल कुमावत यांचे अर्ज दाखल केले. मात्र, विश्वस्तपदावर अजित म्हात्रे आणि मनोज वैद्य या दोघांचा पराभव झाला. या पदावर भगवान चक्रदेव, केशव देशपांडे, नरेंद्र कुलकर्णी, वर्षा प्रभुदेसाई, त्र्यंबक राजगुरू यांची निवड झाली. सदस्यपदासाठी संतोष भणगे, डॉ. अजित गोडबोले, बाळकृष्ण कांबळे, उमा लिमये, डॉ. अजित पटवर्धन, सतीश पालकर, दिलीप साठे हे निवडून आले. ही निवडणूक खऱ्या अर्थाने संघासाठी आव्हानात्मक होती. निकाल लागला असला तरी सदोष मतदार यादीबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.