शिक्षकांचे पगार सोमवारी
By Admin | Updated: February 11, 2017 03:51 IST2017-02-11T03:51:05+5:302017-02-11T03:51:05+5:30
उल्हासनगर पालिका शाळेतील शिक्षकांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात

शिक्षकांचे पगार सोमवारी
उल्हासनगर : उल्हासनगर पालिका शाळेतील शिक्षकांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध करताच आयुक्तांनी त्याची दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. शिक्षकांच्या पगाराचा धनादेश बँकेत टाकला असून सोमवारी त्यांना पगार मिळेल असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी वृत्ताची दखल घेत लेंगरेकर आणि मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांना बोलावून कानउघाडणी केली. पगाराबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. पालिका शिक्षण मंडळ सर्वाधिक वादग्रस्त राहिले आहे. तीन महिन्यांपासून शिक्षकांचे पगार झाले नसल्याने बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली. ‘लोकमत’मधील वृत्तामुळे शिक्षक संघटनांनी आभार मानले.
सरकारने दोन महिन्यांपासून शिक्षकांच्या पगाराचे अनुदान आले नाही. शिक्षण मंडळातील पगाराचे काम लेखा विभाग बघतो असे प्रशासन अधिकाऱ्यांनी आयुक्तांना सांगितले. महापालिकेने शिक्षकांच्या पगाराचे अनुदान दरमहा दिल्यानंतर पगार झाला का नाही? पगाराचा निधी कुठे वापरला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराने शिक्षण मंडळातील सावळागोंधळ उघड झाला आहे.
आयुक्तांनी शाळेतील २५ टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल बोलाविले होते, अशी प्रतिक्रीया प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली. तर शिक्षकांच्या पगाराचा निधी दरमहा शिक्षण मंडळाला पाठवित असल्याचे दादा पाटील म्हणाले. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराने शिक्षकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)