पालघर : मनोर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात राष्ट्रगीत सुरू असतानाच शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संजय लोहार असे या शिक्षकाचे नाव असून त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याने ते व्यासपीठावर कोसळले.
पालघर तालुक्यातील मनोर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ ४ फेब्रुवारीला पार पडला.
आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवारी दहावीचे विद्यार्थी शाळेत आले होते. शाळा सोडतानाचे दुःख तर दुसरीकडे नव्या जगात पुढे जाणार असल्याचा चेहऱ्यावर आनंद घेऊन मुले आनंदात आपल्या शिक्षकांना भेटत होती. मात्र, शिक्षक संजय लोहार यांच्याशी विद्यार्थ्यांची ती अखेरची भेट ठरली. अन्य शिक्षकांप्रमाणे संजय लोहार यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
विद्यार्थी आणि शिक्षकांची भाषणे झाल्यावर राष्ट्रगीत सुरू झाले. राष्ट्रगीत सुरू असतानाच लोहार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले.
उपचारांपूर्वीच केले मृत घोषित
लोहार यांना तातडीने मनोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शाळेत १९९७ साली एचएससी, डी. एड. करून रूजू झालेले संजय लोहार हे विक्रमगड येथील रहिवासी असून अतिशय प्रेमळ, विद्यार्थीप्रिय होते.
सामाजिक उपक्रमात आघाडीवर असणारे शिक्षक म्हणून ते परिचित होते. शाळेत शिकवताना त्यांनी स्वतः आपले पुढील शिक्षण सुरू ठेवत बीए, बी.एड. पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते.
सध्या ते शाळेत पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. कार्यक्रमाची सांगता होत असताना शिक्षकाचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.