‘टीडीसी’ला३ कोटींचा चुना लावणारा अटकेत!

By Admin | Updated: February 21, 2016 02:42 IST2016-02-21T02:42:49+5:302016-02-21T02:42:49+5:30

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वात श्रीमंत बँक असा नावलौकिक प्राप्त केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (टीडीसी) ३५ गाड्यांच्या कर्ज व्यवहारात एजंटने

TDC gets Rs.3 crore loser! | ‘टीडीसी’ला३ कोटींचा चुना लावणारा अटकेत!

‘टीडीसी’ला३ कोटींचा चुना लावणारा अटकेत!

- सुरेश लोखंडे,  ठाणे
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वात श्रीमंत बँक असा नावलौकिक प्राप्त केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (टीडीसी) ३५ गाड्यांच्या कर्ज व्यवहारात एजंटने सुमारे तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. बनावट कागदपत्रांसह वाहनांच्या चाव्या दाखवून घेतलेल्या कर्जातून प्रत्यक्षात गाड्या खरेदीच केलेल्या नसल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीकरिता एकास ताब्यात घेण्यात आल्याने बँकेच्या मुख्यालयात खळबळ उडाली आहे.
या बँकेवर राष्ट्रवादी काँगे्रसची सत्ता आहे. एनसीपी आणि बहुजन विकास आघाडीचे या बँकेवर अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष आहेत. बँकेने गरजू व्यक्तींना गाड्या खरेदीसाठी एजंटमार्फत केलेला कर्जपुरवठा आणि त्यातून बँकेच्या झालेल्या फसवणुकीच्या या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास बडे मासे अडकण्याची शक्यता आहे.
सुमारे ३५ महागड्या गाड्यांसाठी टीडीसी बँकेने एजंटमार्फत सुमारे तीन कोटी रुपये कर्जपुरवठा केला. त्यासाठी देण्यात आलेले कर्ज प्रस्ताव, गाड्या खरेदीची कागदपत्रे, आरटीओ पासिंग सर्टिफिकेट, गाड्यांच्या चाव्या हे बोगस असल्याचे कर्ज वितरणानंतर बँकेच्या लक्षात आले. कर्जाचे हप्ते वसूल करताना हा घोटाळा उघड झाला. सर्व बाजूंनी शहानिशा केल्यानंतर बँकेने एजंटचा शोध सुरू केला असता त्यास शनिवारी शिताफीने ताब्यात घेतले.
शनिवारी दुपारी त्यास बँकेच्या मुख्य कार्यालयात आणून बँक अध्यक्ष बाबाजी पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वकील यांच्या समक्ष डोंबिवलीच्या लोढा हेवन शाखेच्या व्यवस्थापकांनी हजर केले. त्यानंतर, त्यास अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे हजर केल्याचे सांगण्यात आले. गाड्यांसाठी घेतलेल्या कर्जातून त्याने गाड्याच खरेदी केल्या नसल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ३५ गाड्यांच्या या घोटाळ्यात बँकेला अंदाजे तीन कोटी रुपयांचा फटका बसल्याची चर्चा बँक संचालकांमध्ये सुरू आहे. याआधीदेखील बनावट सोने गहाणप्रकरणी बँकेला मोठ्या रकमेचा भुर्दंड पडला होता.

बँकेची सुमारे २७ गाड्यांच्या कर्जप्रकरणात फसवणूक झाली असून त्यापैकी सात गाड्यांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात लोढा हेवन येथील बँकेच्या शाखेकडून २१ मे २०१४ ला गुन्हा दाखल झाला होता. त्यातील एक आरोपी फरार होता. त्याला आज ताब्यात घेण्यात आले आहे. त्या प्रकरणात बँकेची सुमारे ७६ लाखांची फसवणूक झालेली होती. ताब्यातील या आरोपीकडून आता सर्व प्रकरणाची उकल होणार आहे. याआधीदेखील या आरोपीने एका मोठ्या बँकेची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केली होती.
- बाबाजी पाटील, अध्यक्ष टीडीसी बँक

Web Title: TDC gets Rs.3 crore loser!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.