कर थकवणाऱ्यांचा कचरा उचलणार नाही

By Admin | Updated: March 30, 2017 04:17 IST2017-03-30T04:17:17+5:302017-03-30T04:17:17+5:30

कराची वसुली करण्यासाठी पालिकेने काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरच कचरा टाकण्याचा प्रयोग केला होता

Tax exhausted will not lift waste | कर थकवणाऱ्यांचा कचरा उचलणार नाही

कर थकवणाऱ्यांचा कचरा उचलणार नाही

अजित मांडके / ठाणे
कराची वसुली करण्यासाठी पालिकेने काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरच कचरा टाकण्याचा प्रयोग केला होता. परंतु, या प्रयोगानंतरही पालिकेला ‘कचरा कर’ वसुलीच्या नियोजित लक्ष्याच्या अर्धा टक्का लक्ष्यदेखील गाठता आलेले नाही. २० कोटींचे लक्ष्य असताना या विभागाला आतापर्यंत केवळ ७५ लाखांचीच वसुली करता आलेली आहे. त्यामुळे आता केवळ मार्चअखेरपर्यंतच ही मोहीम सुरू न ठेवता नव्या आर्थिक वर्षातही ती सुरू ठेवण्यात येणार असून, कचरा कराची थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांचा कचराच न उचलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सोबतच वेळ पडल्यास दुकानेही सील केली जाणार आहेत.
ठाणे महापालिकेच्या विविध करांमध्ये यंदा प्रथमच कचरा कराचाही समावेश झाला आहे. त्यानुसार, मागील वर्षापासून त्याची वसुली सुरू झाली आहे. परंतु, त्याची वसुलीच न झाल्याने पालिकेने थकबाकीदार व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर कचरा टाकण्याचा प्रताप केला होता. असे केल्याने व्यापारी कचरा कर भरतील, असा कयास प्रशासनाने लावला होता. परंतु, त्यांची ही खेळी त्यांच्यावरच उलटली. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोरील कचरा उचलून तो प्रभाग समिती कार्यालयासमोर टाकला. त्यानंतर, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांची पाठराखण केली. असे कृत्य करणाऱ्या पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र, एवढे होऊनही प्रशासनाला या कराची वसुली करण्यात अपयश आले आहे. घनकचरा विभागाला या कराची वसुली करण्यासाठी २० कोटींचे टार्गेट दिले होते. परंतु, २९ मार्चपर्यंत केवळ ७५ लाखांचीच वसुली झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आता याविरोधात कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. त्यानुसार नव्या आर्थिक वर्षापासून ज्या व्यापाऱ्यांची थकबाकी असेल, त्यांच्या दुकानातील कचराच न उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
प्रभागनिहाय पथके
कराच्या वसुलीसाठी प्रभागनिहाय आणि हजेरी शेडनिहाय पथक गठीत करून वसुली केली जाणार आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात जी भूमिका घेतली जाते, ती आता कचरा कराची थकबाकी ठेवणाऱ्यांबाबत घेतली जाणार असून, त्यांची मालमत्ता सील करण्यात येणार आहे.

Web Title: Tax exhausted will not lift waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.