ठाणे : येत्या रविवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा मार्ग मोकळा राहण्यासाठी टेंभीनाका नवरात्रोत्सव मंडळास शुक्रवारपर्यंत मंडप खाली करण्याचे पत्र शहर पोलिसांनी धाडले आहे. त्यामुळे या ठिकाणी मंडप हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून रस्ता वेळीच मोकळा केला जाईल, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.टेंभीनाक्यावरील नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. ४० वर्षांपासून नवरात्रोत्सवात येथील रस्ता पूर्ण बंद केला जातो. येत्या रविवारी (१६ आॅक्टोबर) ठाण्यात मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा तीनहातनाका येथून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या वेळी साधारणत: तीन लाख नागरिक येतील, असे नियोजन आहे. त्यामुळे मोर्चासाठी रस्ता मोकळा मिळावा, यासाठी मंडप शुक्रवार, १४ आॅक्टोबरपर्यंत हलवण्याचे पत्र ठाणेनगर पोलिसांनी ९ आॅक्टोबरला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या पत्राची दखल घेऊन देवी विसर्जनानंतर मंडपाने व्यापलेला रस्ता तत्काळ मोकळा करण्यास सुरुवात झाली असून तो १५ आॅक्टोबरला वाहतुकीस खुला होईल, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
‘मराठा मोर्चासाठी टेंभीनाक्याचा मंडप काढा’
By admin | Updated: October 14, 2016 06:27 IST